नाशिक,दि. २३ मे २०२३ – विश्वास को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची सन 2023 ते 2028 या कालावधीची निवडणूक बिनविरोध नुकतीच संपन्न झाली असून गेल्या 26 वर्षांपासूनची बिनविरोध निवडणूकीची परंपरा बँकेने यावर्षीही कायम राखली आहे. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विश्वास जयदेव ठाकूर तर उपाध्यक्षपदी अजित मनोहर मोडक यांची निवड बिनविरोध झाली आहे.
बँकेच्या सावरकरनगर येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (वर्ग 1), अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक मा. मनिषा खैरनार यांनी काम पाहिले.
अध्यक्ष पदासाठी विश्वास जयदेव ठाकूर यांच्या नावासाठी सूचक म्हणून संचालिका मंगला कैलास कमोद होत्या तर अनुमोदन बँकेचे संचालक घन:शाम गजानन येवला यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी अजित मनोहर मोडक यांचे नावाचे सूचक संचालक विलास पांडूरंग हावरे होते तर अनुमोदन बँकेचे संचालक मंगेश कमलाकर पंचाक्षरी यांनी दिले.
बँकेच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळामध्ये
विलास पांडूरंग हावरे, मंगेश कमलाकर पंचाक्षरी, घन:शाम गजानन येवला, डॉ.वासुदेव नथुजी भेंडे, कैलास दाजी पाटील, डॉ.चंद्रकांत मोहनलाल संकलेचा, शशिकांत शिवचंद पारख, विक्रम छबुराव उगले, वैशाली संजय होळकर, मंगला कैलास कमोद, सुभाष देवराव पवार हे समाविष्ट आहेत.
यावेळी बोलतांना अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर म्हणाले की, बँकेच्या वाटचालीत संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाने केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. टीमवर्कच्या भावनेतून कार्यरत राहिले तरच स्वप्नवत कार्यदेखील सिद्धीस जाते या उक्तीनुसार विश्वास सहकारी बँकेची वाटचाल सुरू आहे आणि बँकेची ही रौप्यमहोत्सवानंतरची वाटचाल दैदिप्यमान पद्धतीने सुरू आहे.
31 मार्च 2023 अखेर बँकेची सभासद संख्या 9 हजार 878 इतकी आहे, बँकेच्या एकूण ठेवी रु.505 कोटी 6 लाख, कर्जवाटप रु.325 कोटी 34 लाख, सी.आर.ए.आर 13.22% तसेच नेट एन.पी.ए. 0.56% आहे. बँकेच्या आज नाशिकमध्ये 11 शाखा असून बँकेची लवकरच 12वी शाखा सातपूर येथे सुरू होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल बँकिंगची सेवा देण्यात बँक कायमच अग्रेसर असते. गुणात्मक मनुष्यबळ व ग्राहक सेवा हे बँकेचे बलस्थान आहे. लवकरच बँकेमार्फत क्युआर कोडची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेच्या 26 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत आजमितीस बँकेला 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय, 10 जिल्हास्तरीय असे एकूण 44 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व नुतन संचालक मंडळाचे अभिनंदन करून बँकेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.