लेखन, पटकथा आणि संवाद – क्षितीज पटवर्धन, दिग्दर्शन – रवी जाधव, निर्माते – अर्जुन सिंह बरन, कार्तिक डी निशानदार
२०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 ची तरतूद बदलण्यात आली. ज्यामध्ये एकाच लिंगाच्या दोन व्यक्ती एकमेकांशी लैंगिक संबंध ठेऊ शकतात. त्यानंतर फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच जमाती न राहता, LGBTQIA – लेस्बियन, ग्ये, बायसेक्सुअल, ट्रान्सजेन्डर, क्वीयर, इंटरसेक्स आणि असेक्सुअल या समुदायाला मान्यता देण्यात आली.
‘जे कां रंजले गांजले, त्यासि ह्मणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या संत तुकारामाच्या अभंगाने ‘ताली’ च्या कथानकाची सुरुवात होते. थोडंसं आश्चर्य जरी वाटलं तरीही या कथानकाचं सार या अभंगातच सामावलेलं आहे, हे सिरीज संपल्यानंतर रसिकांच्या लक्षात येईल. हे कथानक ‘श्रीगौरी सावंत’ च्या आयुष्यातील सत्यघटनांवर आधारित आहे आणि ट्रान्सजेन्डर या समुदायाच्या आयुष्यावर आधारित नाही, हे निश्चित. याला बायोपिक म्हणता येईल. तिला या तिच्या कार्यामुळे त्या समुदायाने देवत्व बहाल केलं आहे. कथानकात ओघाने किन्नर समुदायाच्या अडचणी लहान सहान स्वरूपात येतात परंतु कथानक पूर्णत: गौरी सावंत या व्यक्तीभोवती फिरत असतं.
‘सुष्मिता सेन’ अभिनित ‘ताली’ ही ‘वेबसिरीज’ ‘श्रीगौरी सावंत’ या ‘ट्रान्सजेंडर’ व्यक्तीवर आधारलेली आहे. तिच्याच सारख्या तमाम ‘ट्रान्सजेन्डर’ समुदायासाठी ती एक लढा उभारते आणि त्यात ती कशी यशस्वी होते, याची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. त्यासाठी ती अक्षरशः रस्त्यावर ठाण मांडून बसते आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयात या समुदायाला न्याय मिळवून देते. ज्या योगे भारतात ‘तिसरे लिंग’ म्हणजेच ‘थर्ड जेन्डर’ ला कायदेशीर मान्यता लाभली. श्रीगौरी सावंत या ट्रान्सजेन्डर व्यक्तीने ‘ट्रान्सजेन्डर’ समुदायासाठी केलेलं महनीय कार्य, त्यासाठीचा ठाम निर्धार, मार्गक्रमण, लढा आणि यशोदायी प्रवास या वेबसिरीजच्या माध्यमातून मांडला आहे.
‘श्रीगौरी सावंत’ ने ‘जगलेलं आणि भोगलेलं जीवन, स्वीकारलेली जबाबदारी आणि एकुणात अन्यायाच्या विरोधात पुकारलेला लढा’ हे कर्मच अत्यंत कठीण आहे. तिने एक इतिहास रचला आहे. सर्वोच्च न्यायालयातून ‘थर्ड जेन्डर’ची मान्यता, महाराष्ट्र इलेक्शन कमिशनची राजदूत अशी गौरीची यशस्वी वाटचाल म्हणजे खरोखरच एक महान कार्य, जे निश्चितपणे सोपं नव्हतं. तालीचं कथानकच दमदार असल्याने त्यावर वेबसिरीज बनू शकली. ताली हा एक ‘बायोग्राफिकल ड्रामा’ आहे. वडील पोलीस खात्यात नोकरीला, घरात आई, मोठी बहिण (अविवाहित) असते. गणूला वर्गात मास्तर विचारतात की मोठा होऊन तुला काय व्हायचंय? तर तो उत्तरतो की मला आई व्हायचंय, मुलाला जन्म द्यायचा आहे. गोल गोल चपात्या बनवायच्या आहेत. तेव्हा तर वर्गात त्याला चुप्प बसावं लागतं, त्याचं हसंही होतं. परंतु त्याची आंतरिक अस्वस्थता वाढतच जाते. कारण तो स्वत:चा शोध घेत असतो. त्याचं शरीर तर माणसाचं आहे परंतु आतून तो स्वत:ला स्त्री रुपात बघत असतो. तीच त्याची आवड असते आणि तेच ध्येय्यही. म्हणून वयाच्या १३/१४ वर्षाचा असतांनाच तो आपल्या कुटुंबाचा आणि घराचा त्याग करतो. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना समाजात लाजेने मान खाली घालायला नको, या एकमेव भावनेने तो हा निर्णय घेतो. इथूनच त्याचा गणेश ते गौरी हा खडतर प्रवास सुरु होतो.
‘मिस युनिव्हर्स’ बनली आणि ‘सुष्मिता सेन’ची ओळख संपूर्ण जगाला झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. परंतु इतर कलाकारांच्या तुलनेत तिच्यातील वेगळेपणा नेहमीच चर्चेत राहिला. देखणेपणा, भाषाप्रभुत्व, स्टाईल, हस्की आवाज आणि भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ’ यामुळे तिची स्वत:ची एक वेगळीच प्रतिमा तिने आजवर जपलेली आहे. मध्यंतरी ‘आर्या’ या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयक्षमतेची जादू रसिकांवर केली. परिणामस्वरूप ‘आर्या २’ची निर्मिती अपरिहार्य ठरली. थोडक्यात काय तर इतर नायिकांच्या तुलनेत अत्यंत कमी भूमिका निभावून्ही ‘सुश्मिता सेन’ प्रेक्षकांवर आपलं गारुड राखून आहे.
अशा या रूपसुंदरीला एका ‘ट्रान्सजेन्डर’च्या भूमिकेत सादर करणे, खरोखरच धाडसाचे.परंतु राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक ‘रवी जाधव’ याने ‘नटरंग, बालगंधर्व आणि बलक-पलक’ च्या यशानंतर हे धाडस केले. दिग्दर्शकाने या प्रदर्शनात गणेशचं बालपण आणि गौरीचं वर्तमान जीवन हे दोन्ही काळ अत्यंत खुबीने दाखवले आहेत. लहानपणापासून आपल्यातील वेगळेपण, आपली इच्छा, कामना, शारीरिक बदल आणि बाहेरच्या जगाशी चाललेला झगडा, आई बनायची आंतरिक इच्छा आणि किन्नर समुदायाचा बुलंद असा आवाज निर्माण करण्याची ताकद या दोन स्तरांवर हे कथानक हळूहळू सरकत जातं. ‘सुश्मिता सेन’ गौरीच्या भूमिकेत एकदम चपखल बसली आहे. विस्फारलेले डोळे, या भूमिकेसाठी वापरलेला खास खर्जातला आवाज आणि एकुणात पवित्रा या त्रिवेणी संगमाने ‘गौरी सावंत’ प्रेक्षकांसमोर मांडण्यात तिला १००% यश लाभलं आहे.
केवळ त्याचमुळे या कथानकाचा सार प्रेक्षकांना पटतो आणि भावतोही. सुश्मिताचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहेच. या भूमिकेसाठी मराठी शब्दावर जोर देऊन बोलतांना आणि प्रसंगी इंग्रजी उच्चारतांना तिने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. ‘गौरी सावंत’ या कधीही न ‘पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि भेटलेल्या’ व्यक्तीबद्दल प्रेक्षकांमध्ये आपलेपणा ,अनुकंपा आणि उत्सुकता निर्माण करण्याचं श्रेय्य निश्चितपणे सुश्मिता सेन या अभिनेत्रीला जातं आणि म्हणूनच प्रेक्षक कथानकाशी शेवटपर्यंत बांधले जातात. यातील इतर कलाकार – नंदू माधव, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, कृतिका देव, सुव्रत जोशी, अंकुर भाटीया, विक्रम भाम, अनंत महादेवन यांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. त्या कथानकाला पूरकही आहेत. परंतु सुश्मिता सेनच्या एकुणात सादरीकरणात ही मंडळी झाकली गेली आहेत. यातील संवाद अतिशय अर्थपूर्ण असल्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. गौरी म्हणते की अमेरिकेत कुठे किन्नर टाळ्या वाजवतात आणि भीक मागतात. आपल्या समुदायाला काही पर्यायच उरत नसल्याने संपूर्ण समुदाय ‘सेक्स वर्कर’च्या पंथाला लागतो. इतर समाज आपला गैरफायदा घेत आहे. आपण जर शिक्षित झालो तर आपला गैरफायदा कोण कसा घेऊ शकेल, असा विचार गौरी मांडते आणि समुदायाचा प्रमुख आधारस्तंभ बनते. परंतु तिने कधीही रस्त्यावर भिक मागितली नाही की इतरांप्रमाणे एक ‘सेक्स वर्कर’चा मार्ग स्वीकारला नाही, हे विशेष! ती स्वतंत्रपणे जगत राहिली आणि तिच्यासारख्या अनेक पीडितांचा आधार बनली. कदाचित तिच्याकडे पुरुषांना आकर्षित करण्याजोगं रूप नव्हतं, म्हणून ती हा स्वतंत्र मार्ग निवडू नसेल, परंतु तिला समाजाकडून कोणतीही मदतीची किंवा अस्तित्वाची दखल अपेक्षितच नसल्याने तिचा हा लढा यशस्वी ठरू शकला.
यातील काही प्रसंग मात्र दिग्दर्शकाने अतिशय संयतपणे चित्रित केले आहेत. ‘गणेशचं ट्रान्सजेन्डरचं ऑपरेशन आणि वडिलांचं श्राद्ध घालणं, हे एकाचवेळी दाखवल्याने एकुणात समाजाचा या समुदायाकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. सर्वोच्च न्यायालय ‘ट्रान्सजेन्डर’ला मान्यता देण्याचा निर्णय जाहीर करत असतांना गौरी मुलाखतीत म्हणते “तू मुश्किल दे दे भगवान, मैं आसान करूं, तू दे तपती रेत, मैं गुलिस्ता करूं, तू पहाड़ बना दे जितने, मैं उसमें सुरंग बनूं, तू लाख गिरा दे बिजली मुझ पर, मैं तो सतरंग बनूं।”एका ऐतिहासिक निर्णयाची आखों-देखी अनुभवण्यासाठी ‘ताली’ बघायलाच पाहिजे.
‘ताली’ – वेब सिरीज जिओ सिनेमा
एनसी देशपांडे
९४०३४ ९९ ६५४
