माहिमच्या समुद्रात मजार आली कुठून ? राज ठाकरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
राज ठाकरेंच्या घणाघाती भाषणातील ९ मुद्दे
मुंबई,दि.२२ मार्च २०२३ – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा उभारण्याचे काम सुरु असून या दर्ग्यावर एका महिन्यात कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असा इशारा राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला.
राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात एक व्हिडीओ दाखवत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा उभारण्यात आल्याचा आरोप केला आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे, अशी विचारणा एकाला केली. त्यानंतर त्याने ड्रोन फूटेज पाठवले. त्यात हे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले. हे अनधिकृत बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.हा दर्गा हटवावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे.
राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता राजकीय तसेच प्रशासकीय चक्रे वेगाने हलू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आमदार सदा सरवणकर हे गुरुवारी माहीमच्या समुद्रातील या दर्ग्याची पाहणी करणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी माहीम समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे.
मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावरून पु्न्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मागील मविआ सरकारने भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या १७ हजार मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख ९ मुद्दे
१) शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे सांगतोय, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग… मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका.. उद्धव म्हणाले की मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव ना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धवना शिवसेनेत आम्ही नको होतो.
२) नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही.
३) शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं त्याने मला त्रास झाला. मला बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा नव्हता, माझी कसलीच महत्वकांक्षा नव्हती.माननीय बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं. २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं. आणि अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं..
४) अमित शाह ह्यांनी चार भिंतीत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून घेत होते तेंव्हा का नाही आक्षेप घेतलात ? आपल्याशिवाय सत्ता बसत नाही बघून मुख्यमंत्रीपदाची मागणी काढली. मुख्यमंत्री पद मिळवायचं म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच मांडीत जाऊन बसले. अजित पवार -फडणवीस ह्यांनी शपथविधी घेतली. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात
५) उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते, आमदारांना भेटायचे नाहीत. मग ४० आमदार कंटाळून सोडून गेले. मग २० जून २०२२ ला सुरत-गुवाहाटी-गोवा प्रवास झाला. महाराजांनी सुरतेची लूट करून आणली इथे हे लुटून सुरतेला गेले.
६) माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. खेडमध्ये सभा घेतली घेतली शिंदेनी
७) राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल
८) मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल.
९) माझी तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. येत्या ६ जून २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वतः रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या. आणि हिंदू बांधवांना विनंती आहे की, ‘दक्ष रहा.’…