श्रीलंकेचा पराभव करून भारत विश्वचषकाच्या सेमीफायनल मध्ये दाखल
मोहम्मद शमीने इतिहास रचला, भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
मुंबई,दि,२ नोव्हेंबर २०२३ – विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९.४ षटकांत अवघ्या ५५ धावांत गडगडला.भारताने सलग सातवा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान प्राप्त केले आहे.
भारताने उपांत्य फेरी गाठली
यासह, भारतीय संघाने सलग सात विजयांसह २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव करत विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. शमीने पाच, सिराजला तीन आणि बुमराहला एक विकेट मिळाली. या संपूर्ण विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये बुमराहने १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहने सात सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या असून तो भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
श्रीलंकेचे पाच फलंदाज खाते उघडू शकले नाहीत.
आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही, अशी परिस्थिती होती. यामध्ये पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, दुशन हेमंथा आणि दुष्मंथा चमीरा यांच्या नावांचा समावेश आहे.
कसून रजिथा, महेश तीक्षणा आणि अँजेलो मॅथ्यूज दुहेरी अंक गाठण्यात यशस्वी झाले:
भारताविरुद्धच्या आजच्या सामन्यात श्रीलंकेचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. संघासाठी रजिताने १७ चेंडूत १४ धावा, तीक्षणाने २३ चेंडूत १२ नाबाद धावा आणि मॅथ्यूजने २५ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले.
मोहम्मद शमीने इतिहास रचला
मोहम्मद शमीने विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरे पाच बळी घेतले. याआधी केवळ ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने हा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावावर आता विश्वचषकात तीन 5 विकेट्स आहेत. शमीने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध पहिले पाच बळी घेतले. या सामन्यात त्याने हॅट्ट्रिकही घेतली. यानंतर त्याने या मोसमात न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स (भारत)
मोहम्मद शमी- ४५ विकेट्स
जवागल श्रीनाथ- ४४ विकेट्स
झहीर खान- ४४ विकेट्स
जसप्रीत बुमराह- ३३ विकेट्स
अनिल कुंबळे – ३१ विकेट्स