मुंबई –जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे ‘आनंद दिघे’. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. धर्मवीर आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.
आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा !
प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट आणि झी स्टुडिओजने केली आहे. येत्या २१ ऑगस्टला संध्याकाळी ७. वा. ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ फक्त झी मराठीवर होणार आहे.