८ मार्च… जागतिक महिला दिन साजरा केला जातो. स्त्रीला आणि स्त्रीपणाला आदर करण्यासाठी आणि स्त्रीतल्या स्त्रीत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ८ मार्च हा दिवस निश्चित केला आहे. २० व्या शतकाच्या सुरवातीपासून जगातील विविध देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात होता आणि आता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झाला आहे. या दिवशी समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा आदर सत्कार केला जातो. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, उद्योजक, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. याचबरोबर स्त्रीशक्तीचा जागर, स्रीहक्कांची जाणीव आणि जनजागृती केले जाते. स्त्रीपुरुष समानता याबद्दल बोलले जाते, त्याचप्रमाणे स्त्री वरील होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांबाबत आवाज उठवून स्रीहक्काची जाणीव केली जाते. याकरिता विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. खरोखरच जर आपल्याला महिला दिनाचा उद्देश सफल करायचा असेल, तर आपल्याला तिच्यातील “ती” ला समजून घेणे गरजेचे आहे. “ती”ला समजून घेतले तर तिच्यातील “ती”ला मानसन्मान आणि सलाम केला जाऊ शकतो. चला, तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
असं म्हणतात की, स्त्रीच्या मनात काय आहे, हे देवालाही कल्पना करता येणार नाही. खरं, तर उपहासात्मक हेतू बाजूला ठेवला तर काही अंशी हे वाक्य खरं ही आहे. तिच्या मनात जे असतं, ते कुठल्याही पुरुषाला जाणून घेणे थोडे अवघडच असते. याला मी जेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले, आणि तिच्याबद्दल अभ्यास केला, काही वेळा निरीक्षण केले आणि जे काही अनुभव घेतले त्यावरून मी हे सांगू शकतो की, ती काही वेगळीच असते, आणि आहे. तिला समजून घेतले की, तिचा नेमका उद्देश काय आहे, विचार काय आहे, हेतू काय आहे, ती जी काय करते ते ती का करते आणि कशी करते हे लक्षात येते. तिला हाताळण्यासाठी खूप कष्ट घेण्याची आवश्यकता पडत नाही. यासाठी एक गोष्ट मान्य करावी लागते आणि स्वीकारावी लागते, की स्त्री आणि पुरुष वेगळे असतात. त्यांचे विचार वेगळे असतात, विचार करण्याची पद्धत वेगळी असते. बोलण्यावागण्याचे हेतू आणि कारणे वेगळे असतात. दोघांचेही काही वैशिष्ठ्ये असतात, जे भिन्न असतात. जोपर्यंत तुम्ही ती भिन्नता मान्य करत नाही, तोपर्यंत तुम्ही “ती”ला समजून घेऊ शकत नाही, आणि परिणामी तिच्यातील “ती”चा सन्मान करू शकत नाही. स्त्रीत असलेल्या काही वैशिष्ठ्यपूर्ण क्षमता आणि सद्गुणांना समजून घेऊ या, बघा माझं म्हणणं पटतंय का…?
अमर्याद स्मरणशक्ती
स्त्रीचा हा सर्वात महत्वाचा आणि वैशिष्ठ्यपूर्ण गुण म्हणावा लागेल. याची प्रचिती तुम्हाला अनेकदा आलेली असेलही. दहा वर्षांपूर्वी कोण कुणाला काय बोलले होते, कुठे बोलले होते, कसे बोलले होते, तिथे कोणकोण होते, कुणी काय कपडे घातलेले होते, याबाबद्दल स्त्रिया शब्दना शब्द आणि तो प्रसंग जसाच्या तसा तुमच्यापुढे मांडू शकतात. तुम्ही तिला काही सांगितलं असेल, किव्हा एखाद्या कामाची आठवण करून देण्यास सांगितलं असेल तर ती तुम्हाला बरोबर त्या त्या वेळी आठवण करून देईल. एखादी गोष्टी तुम्ही सहजपणे बोलला असाल, त्याचा तुम्हाला विसरही पडला असेल, पण ती तुम्हाला लक्षात आणून देईल. बऱ्याचदा या गुणांचा महिलांना त्रास होतो, कारण समोरची व्यक्ती काहीतरी बोलून जाते, पण तिच्या मनात ते राहते, आणि त्याचाच तिला त्रास होत असतो, किंबहुना ती स्वतःला त्रास करून घेत असते. अनेकदा घडून गेलेल्या प्रसंगांची आठवणी काढून महिला स्वतःला अडचणीत आणतात. भूतकाळातील गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता या सद्गुणाचा भविष्यातील नियोजनासाठी वापर केला तर निश्चितपणे फायदा होईल. पुरुषांनी सुद्धा त्यांच्या या गुणाचा सदुपयोग करण्यासाठी आईला किव्हा पत्नीला त्यांच्या एखाद्या महत्वाच्या कामाची आठवण करून देण्यास सांगितले तर नक्कीच लाभ होईल.
मल्टी टास्किंग
हाही स्त्रीचा खूप महत्वाचा आणि परिणामकारक गुण आहे. एकाच वेळी अनेक कामं करण्याची त्यांची क्षमता असते. पुरुषाच्या हाती एखादे काम असताना त्याला दुसरे काम सांगितले की त्याची चिडचिड होते, दडपणे येते. परंतु, घरातील स्त्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कामे हाताळत असतात. सकाळी स्वतःचे आवरणे, मुलांची तयारी करून देणे, नवऱ्याच्या वस्तू काढून देणे, सासू सासऱ्यांच्या चहा नाश्त्यापासून औषधांची सोय करणे, एकीकडे किचन, तर दुसरीकडे बाहेरची कामं दोन्ही तितक्याच कुशलतेने हाताळणे हे फक्त स्त्रीच करू शकते. लगोलग आवडती सिरीयल बघण्याचेही काम चालूच असते. शहरातील नोकरी करणारी स्त्री, स्वतःचे काम, ऑफिस, बँकेचे कामं, बिले भरणे, मुलांच्या शाळा कॉलेजच्या गरजा आणि त्यानुषंगाची कामे न थकता करू शकतात. ग्रामीण भागातील महिला शेतातली कामे पुरुषांच्या बरोबरीने करतात. स्वयंपाकात एकाच वेळी चहा, नाश्ता, चपाती, भाजी, भात, वरण, चटणी असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. आपल्याला असे वाटते की गृहिणी कुठे काय करतात, पण घरातील किचन, बेडरूम, हॉल, डायनिंग, बाथरूम, बाल्कनी, असलाच तर टेरेस, गार्डन हे सर्व एकाच वेळी मॅनेज करण्यासाठी तुम्हाला स्त्रीच असावे लागते.
सृजनशीलता
अर्थात, क्रिएटिव्हिटी. नवीन नवीन गोष्टी करणे, नवीन कामं करणे, नवीन प्रयोग करणे, पदार्थ करणे हे स्त्रीपणाचे लक्षण असते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे स्त्रीच करू शकते. त्यांचे विचार नेहमी काहीतरी निर्मितीच्या दिशेने असतात. घरातील सजावट करणे, स्वयंपाकात नवनवीन पदार्थ बनविणे, कपड्यांच्या नवनवीन डिजाईन तयार करणे, विणकाम, शिवणकाम, अशा कामातून त्यांची सृजनशीलता लक्षात येते. याकरिता स्त्रियांनी फॅशन डिझाइनर, इंटिरियर डेकोरेटर, लँडस्केप आर्किटेक्ट, मेकअप आर्टिस्ट, कॉस्मेटिक्स, अस्थेटिक्स, डिजिटल डिजाइनिंग, आर्ट अँड क्राफ्ट्स, ड्रॉईंग, निटिंग… ई कलेशी निगडित क्षेत्र निवडल्यास त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल. सृजनशीलतेसोबत आणखी एक विलक्षण गुण महिलांमध्ये असतो. तो म्हणजे महिलांना रंग (कलर), गंध (स्मेल), चव (टेस्ट), स्पर्श (टच) आणि नजर हे सर्व इंद्रिय खूप तीक्ष्ण असतात. एकाच रंगांच्या अनेक छटा, गंधातील फरक, बदललेली चव, एखाद्याचा स्पर्श आणि त्याचा हेतू आणि समोरच्या व्यक्तीची नजर त्वरित लक्षात येते. या पाच इंद्रियांच्या पलीकडेही त्या सेन्स करू शकतात, ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो. अगदी पाठीमागून चालत येणाऱ्या माणसाची चाहूल आणि भाव ओळखू शकतात, असे म्हणता येईल, इतकी स्ट्रॉंग त्यांची सेन्सिंग पॉवर असते. पुरुषांच्या लक्षात येणार नाही, पण जेव्हा आई, पत्नी किव्हा मुलगी जर म्हणत असेल की ही व्यक्ती मला बरोबर वाटत नाही किव्हा आवडत नाही, समजून घ्या ती व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते.
भावुक स्वभाव
महिलांच्या वागण्यात भावनिकता असते. पुरुष मेंदूने (तर्क) विचार आणि कृती करतात, तर महिला हृदयाने (भावनिक) विचार करतात. प्रत्येक नात्याला महिला भावनिक दृष्टिकोनातून बघतात आणि त्याप्रकारे अडकून जातात. त्यांची अपार निष्ठा असते आणि एकदा का नाते जोडले की ते त्यांच्या दृष्टीने अतूट असते. कुणाचे दुःख बघवत नाही, कुणाच्या दयेच्या हाकेला बळी पडतील, असा त्यांचा स्वभाव असतो. प्रमाची भावना तर त्यांच्यात ठासून भरलेली असते. मग ते आई-वडिलांवरचे प्रेम असो, की मुलावरचे, प्रियकरावर असो की पतीवर. भरभरून प्रेम करतात. प्रेमळ, मायाळू, दयाळू, करुणा हे विशेष गुण स्त्रीत्वाचे लक्षणे असतात. प्रेमभंग करण्याचा विचारही त्यांच्या मनी नसतो, आणि झालाच तर ते सहनही करू शकत नाही. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक पुरुष हिरोच्या रुपात असतो. बालपणी वडील हिरो असतात, तरुणपणी प्रियकर आणि लग्नानंतर पती त्यांच्यासाठी हिरो असतो. महिलांना भावना व्यक्त करायला आवडतं. थोडं जरी काही वाटलं तर भावना बोलून दाखवतात, त्रास होत असेल तर बोलतात, अडचण असली तर सांगतात. त्यांचा आनंद ही खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. खूप मोठे मोठे स्वप्न नसून एका आय लव यु म्हंटले तरी पघळून जातात. एक गुलाबाचे फुल, एखादा गजरा घेतला तरी तुमची संध्याकाळ अगदी मजेत गेलीच म्हणून समजा. पुरुषांना या गोष्टी खूप किरकोळ वाटतात, गौण वाटतात, परंतु स्त्रियांसाठी या खूप मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टी असतात. घरी आल्यावर बायकोचे गाऱ्हाणे ऐकणे पुरुषांना कटकट वाटते, पण त्यांची एव्हढीच इच्छा असते, की मला कुणीतरी ऐकतंय, तुम्हाला फक्त त्यांना कान द्यायचा आहे, सल्ला नाही.
या आणि अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या पुरुषांना कदाचित माहीत नसतात, आणि जरी माहीत असल्या तरी त्या किरकोळ वाटतात. पण हे मात्र नक्की की स्त्री ही स्त्री असते, आणि पुरुष पुरुष असतात. दोघेही भिन्न असतात आणि आहेत, हे लक्षात असू द्यावे. दोघांनी एकमेकांचे वेगळेपण मान्य केले आणि जपले तर ते नाते एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकते. घरातील आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण बदलण्यास मदत होईल. आजच्या महिला दिनानिमित्त तिच्यातल्या त्या वेगळेपणाचा मान ठेवून “ती”चा आदर करूया आणि “ती”च्या सर्व गुणांसाठी आणि आपल्या जीवनातील “ती”च्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.

डॉ. संजय धुर्जड
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
drdhurjad@gmail.com