नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण यांनी कायम विकासात्मक समाजकारण, जनसंघटन जनतेशी मैत्री, विचारांशी तत्वप्रणाली यांची सांगड घालून विधायक विचारांची जोपासना केली आणि महराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर नेले त्यासाठी फुले- शाहू- आंबेडकर यांचा विचार वारसा आणि स्त्री मुक्तीचा विचार, स्त्री शिक्षणाची प्रभावी रुजवात केली, दूरदृष्टी दिली, असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक व विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले
यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत प्रा.डॉ. रावसाहेब कसबे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्राचे थोर शिल्पकार-यशवंतराव चव्हाण’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.ते पुढे म्हणाले की, भारतात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची प्रगती, चोहोबाजूने झाली आहे आणि गुणवत्तापूर्ण झाली. महाराष्ट्रात साहित्य, कला, शिक्षण, प्रशासन यांतील मूलभूत बदल केले. महाराष्ट्राला व्हिजन दिले. कार्यकत्यांची स्वता:ची विचारधारा असावी व त्यातून तळगाळातील विकासाचे ध्येय पोहचवता येते. त्यासाठी तपश्चर्या असावी. यावेळी डॉ.रावसाहेब कसबे यांनी यशवंतराव चव्हाणांचे वाचन, त्याची व्यक्तिला समजून घेण्याची वृत्ती, तसेच महाराष्ट्रातील व भारतातील गेल्या ५० वर्षातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला. तसेच राजकारणातील बदलते प्रवाह यांची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी येथे हे व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले. डॉ.कसबे यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केले. सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अॅड.नितीन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास अॅड.दौलतराव घुमरे, डॉ.भाऊसाहेब मोरे, प्रा.अशोक सोनवणे, कॉ.राजू देसले, आदि मान्यवर उपस्थित होते.