मुंबई,१३ मार्च २०२३ – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असतानाच हवामान खात्यानं मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे.यात प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्यानं विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.हिमालयात होणारी बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे.
येत्या तीन दिवसांत राज्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपत आलेला असताना अद्याप अपेक्षित उन्हाची चाहूल लागलेली नाही. त्यातच आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान होणार असून येत्या हंगामातील पिकांचं वेळापत्रक कोलमडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
13 Mar: Thunderstorm with lightning,light- mod rain & gusty winds (30-40kmph) at isol places very likly. Possibility of hail too at isol places interior.
विजांच्यासह,हलका-मध्यम पाऊस,सोसाट्याचा वा-याची (30-40kmph) शक्यता.राज्याच्या अंतर्गत भागातही गारपिटीची शक्यता; 15-17 Mar
– IMD pic.twitter.com/5dRfLSXBbq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 13, 2023
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज आएमडीनं वर्तवला आहे. त्याचा कांदा, मका, फळबागा आणि भाजीपाल्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील वातावरणात उष्णता वाढणार असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळं आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.