मंदार देवस्थळी करणार या मालिकेचं दिग्दर्शन

0

मुंबई – मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी अनेक लोकप्रिय मालिका आज पर्यंत प्रेक्षकांसाठी सादर केल्या. ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘फुलपाखरू’, या त्यांनी दिग्दर्शिका केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मंदार देवस्थळी यांच्या मालिकांमधील प्रेमकथांचा आशय हा नेहमी रंजक असतो. मंदार देवस्थळी पुन्हा एकदा नवी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

छोटाश्या अल्पविरामानंतर ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत पुन्हा एकदा बसले आहेत. झी मराठीवरील आगामी मालिका ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेचं ते दिग्दर्शन करणार आहेत. गुणी आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून मंदारकडे पाहिलं जातं. त्यामुळे ही आगामी मालिका प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करेल; असं म्हणायला हरकत नाही.

नुकतंच या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. ३० ऑगस्टला संध्याकाळी ७.३० ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या या मालिकेत मध्यवर्ती भूमिका आहेत.

या मालिकेबद्दल बोलताना मंदार देवस्थळी म्हणाले,”एक वेगळी आणि अतिशय रंजक प्रेमकहाणी आम्ही मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. प्रेक्षकांचे अत्यंत लाडके कलाकार या मालिकेत त्यांना दिसणार आहेत. तसेच एक गोड आणि फ्रेश लव्हस्टोरी त्यांना पाहायला मिळेल जी पाहताना त्या व्यक्तिरेखांसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी मी आशा करतो.”असे मंदार देवस्थळी यांनी सांगितले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.