नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे नाशिक शहर आणि जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्याऐवजी निषेध बैठकच शहर कॉंग्रेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात पार पडली.या बैठकीमध्ये नवनियुक्त कार्यकारणीत नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यावर आक्षेप नोंदवण्यात आला असून तत्काळ स्थगिती देण्याची एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.
नाशिक शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील कार्यालयात पार पडली त्यावेळी नाशिक शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागुल,ज्येष्ठ उपाध्यक्ष उल्हास सातभाई,महाराष्ट्र कॉंग्रेस कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत,प्रदेश अनुसूचित सेलचे सुरेश मारू,माजी नगरसेवक रईस शेख,सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकुर,प्रदेशचे माजी पदाधिकारी भारत टाकेकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनिफ बशीर, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे , युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील,मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नाशिकरोड ब्लॉकचे अध्यक्ष दिनेश निकाळे, सिडको ब्लॉकचे अध्यक्ष विजय पाटील,पंचवटी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार,सातपूर ब्लॉकचे अध्यक्ष कैलास कडलग, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे,युवक कॉंगेसचे माजी अध्यक्ष व माजी प्रदेश पदाधिकारी संदीप शर्मा, भरत पाटील युवक कॉंग्रेसचे जावेद पठाण,अभिजित राऊत, सचिन दिक्षित, सिध्दार्थ गांगुर्डे यांच्यसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीबाबत सर्व पदाधिकारी दोन दिवसांत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर तत्काळ शहर कॉंग्रेस कमिटीचे कामकाज बंद करण्याचा ठराव झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांनी सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारीणीत काहींना तर कधी बघितलेच नाही तर काही तालुका पदाधिकारी म्हणून काम न केलेल्या लोकांना प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले शिवाय संघटनेसाठी देखील घातक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.अडचणीच्या काळात पक्षासाठी पदरमोड करून वेळ देऊन देखील नेतृत्व निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रतिनिधत्व देत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.निष्ठावानांना डावलल्यामुळे पक्ष संघटनेत वाढ होणार नाही त्यामुळे पक्ष श्रेष्ठीनी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.