नाशिक,दि,१ मे २०२४ – महायुतीत मात्र अजूनही नाशिकच्या जागेवर उमेदवार ठरलेला नसला तरी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकची जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे सूचक विधान केले आहे. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.नाशिकची जागा १००% शिवसेनेचीच असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील असे बावनकुळे म्हणाले.तर पालघरच्या जागेवर भाजपकडून उमेदवार घोषित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज नाशिकच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील अशी शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली.उद्या दि २ मे रोजी दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भारती पवार यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून जर आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची घोषणा झाल्यास उद्या दोन्ही मतदार संघातील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे हि ते म्हणाले.
दिलेल्या उमेदवाराना निवडून आणणार यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले,”नाशिकच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने चर्चा करावी असे भाजपचे मत होते.मात्र नाशिकची जागा ही शिवसेनेची असल्याने याबाबत शिंदे निर्णय घेतील.या जागेवर कोणताही उमेदवार असला तरी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे.५१ टक्के मतांनी ही जागा महायुतीने जिंकावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत”,असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.