पुण्यात पावसाचा हाहा:कार : सिंहगड़रोड वरील अनेक घरे पाण्याखाली
पुणे,रायगड,पालघरला रेड अलर्ट तर नाशिक,मुंबई,ठाणे ,नंदुरबार,कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट
मुंबई,दि,२५ जुलै २०२४ – संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून पुण्यात पावसाचा हाहा:कार बघायला मिळतो आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर नाशिक मध्ये गेल्या ३ दिवसा पासून पाऊस सुरु असून धरण क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे भावली धरण १०० टक्के भरले असून दारणा धरण ७५ टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग सुरु आहे. आज नाशिक,मुंबई,ठाणे ,नंदुरबार,कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात तुफान पाऊस सुरु आहे.गेल्या काही तासांपासून मुंबईत बरसत असलेल्या पावसाचा जोर खूपच जास्त आहे. या सरींची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर गटार आणि डोंगराळ भागातील माती आणि राडारोडा रस्त्यावर वाहून आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची आजची सकाळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यानुसार आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेन ५ ते १० मिनिटांच्या उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकही विलंबाने आहे. आणखी काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प होण्याची किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळांना आज सुट्टी
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.