नाशिक – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व क्रिडक स्पोर्टिंग एक्सलंस ऍण्ड परफॉर्मन्स ह्यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट खेळाडुंचे तंदुरुस्ती चाचणी – फिटनेस टेस्ट इन क्रिकेट – शिबीर संपन्न झाले. महात्मा नगर क्रिकेट मैदानावरील सभागृहात क्रीडक चे विनोद यादव ह्यांच्या पुढाकाराने हे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आज रविवार दिंनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी अतिशय उत्तमरीत्या पार पडले.
या शिबिरात विनोद यादव ह्यांनी क्रिकेट खेळाडुंच्या तंदुरुस्ती विषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. खास क्रिकेट खेळाच्या दृष्टीने तंदुरुस्ती चाचणीची विविध तंत्र शिबिरात अभ्यासली गेली. प्रशिक्षकांच्या तंदुरुस्ती चाचणी विषयीच्या माहिती व अनुभवात भर पडण्याच्या दृष्टीनेच सदर शिबिराची रूपरेषा ठरविण्यात आली होती. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तसेच शहर व जिल्हयातील एकंदर ३५ क्रिकेट प्रशिक्षकांनी ह्याचा लाभ घेतला. इगतपुरी, त्रिंबक,मनमाड , सिन्नर व येवला सारख्या तालुक्यातील क्रिकेट प्रशिक्षकांनी उत्साही सहभाग नोंदविला.
क्रिडक तर्फे राज्यस्तरीय खेळाडूंना विशेष मोफत तंदुरुस्ती व आहार विषयक मार्गदर्शन मिळणार असुन, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या सर्व महिला खेळाडूंना खास ५० टक्के सवलत मिळणार आहे.अशा रीतीने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या खेळाडूंना तंदुरुस्ती ठेवण्यासाठी क्रिडक आपले योगदान देत आहे.यापुर्वी देखील क्रीडक स्पोर्टिंग एक्सलंस अँड परफॉर्मन्स ह्यांचे तर्फे क्रिकेट प्रशिक्षकांचे प्रशिक्षण तंत्र शिबीर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन बरोबर आयोजित करण्यात आले होते.
भावी काळातील क्रिकेट तंदुरुस्ती प्रशिक्षणात सदर शिबिराचा नक्कीच चांगला उपयोग होईल अशी भावना शिबिरार्थीनी व्यक्त केली. अतिशय यशस्वीरीत्या पार पाडलेल्या शिबिरानंतर सर्व सहभागी प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले.अशी माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी समीर रकटे यांनी दिली.