महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली:आझाद मैदानावर पार पडणार सोहळा ?
शिंदे नाराज,महायुतीची आजची बैठक रद्द
मुंबई,दि,२९ नोव्हेंबर २०२४ –महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर पार पडणार आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडेल. निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.अखेर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आता समोर आली आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे, तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर ठेवण्यात आलं आहे असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्रिपदाच्या योग्यतेची नाही का असा सवालही त्यांनी विचारला.
शिंदे नाराज, महायुतीची बैठक रद्द
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची आज होणारी शुक्रवारची बैठक रद्द करण्यात आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी रवाना झाले असल्याची सुत्रांनी दिली आहे.
खाते वाटपाबाबतची चर्चा लवकरच पूर्ण होईल-उदय सामंत
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले की, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पुन्हा एकदा शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत चर्चा होईल. मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबतची चर्चा लवकरच पूर्ण होईल. गुरुवारी शिंदे यांची अमित शहा यांच्याशी भेट झाली, तेव्हा अतिशय चांगले वातावरण होते.