फॅन्टसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे नाटक “तीन दिवसाची पाहुणी”
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ६ डिसेंबर रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर,सौ. स्मिता हिरे परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक या संघातर्फे तीन दिवसाची पाहुणी हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक फँटसीवर आधारित आहे. या नाटकात अनेक सामाजिक विषयांवर परखडपणे भाष्य केले आहे. कौटुंबिक हिंसाचार, गावखेड्यातल्या अंधश्रद्धा व सामाजिक दडपण, कामगारांचे प्रश्न, घराकाम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, एकल, विधवा स्त्रियांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांचा प्रश्न इ. अनेक सामाजिक विषयांवर तीन दिवसांचे पाहुणे या नाटकात भाष्य करण्यात आले असून निखळ मनोरंजनातून सामाजिक विषयावर प्रबोधन करण्यात आले आहे. अल्ट्रासिड नावाच्या एका ग्रहावरून चुकून पृथ्वीवर आलेल्या एका मुलीची ही गोष्ट आहे. तिच्या ग्रहाचा १ दिवस म्हणजेच पृथ्वीचे २१ वर्ष. पृथ्वीवर येतानाच ती २१ वर्षांची होते. तिच्या ग्रहावरून तिला घ्यायला येण्यासाठी त्यांचा एक दिवस तरी लागणार. असे तिला तिच्या ग्रहाचा समन्वयक सांगतो. याचा अर्थ वयाच्या ४२ वर्षांपर्यंत ( पृथ्वीच्या ) तिला पृथ्वीवर राहणे भाग असते. परंतु ज्यावेळेस तिला घ्यायला येणार असतात तेव्हा ती तिथल्या संसारात अडकून पडल्यामुळे त्यांना एक दिवस उशिरा घ्यायला येण्यासाठी सांगते. अशा रीतीने वयाच्या ६३ वर्षांपर्यंत तिला पृथ्वीवर थांबावे लागते. पण तिच्या ग्रहाचे मात्र तीनच दिवस असतात. म्हणजेच ती पृथ्वीवर त्यांच्या ग्रहाच्या ३ दिवसांची पाहुणे असते. या फॅन्टसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य करण्यात आले असून हे नाटक प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संगीता पवार – फुके यांनी केले. प्रकाशयोजना तुषार आव्हाड व संगीत राकेश भंडारी यांचे होते. नेपथ्य प्रमोद सावळे व रंगभूषा माणिक कानडे यांची होती. या नाटकामध्ये अनामिका – गरिमा फुके, सर्जा – प्रशांत सोनवणे, मास्तर – गोपाल जगताप, राहीबाई – रेखा नरवाडे, राम – कालिदास आचारी, अनिता – सोनाली निकम, सुनिता – प्रेमा कोतकर, आप्पासाहेब – देवव्रत जाधव, सुलभा मावशी – मनीषा जाधव, कमला देशमुख – मीना आहेर, श्री. देशमुख – प्रमोद सावळे, छोटा राम – जोनानाथ जगताप, छोटा लखन – प्रजेस सावळे यांनी भुमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक -फुली
संस्था – मानवता बहुउद्देशीय विकास संस्था
लेखक – संदिप पाचंगे
दिग्दर्शक – मुकेश काळे