मुंबई,दि,४ मार्च २०२५ – संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर काल रात्री देवगिरीवर एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत धनंजय मुंडे राजीनामा देतील असा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान आज काही वेळा पूर्वी धनंजय मुंडे यांनी स्वीय सहाय्यक यांच्या हस्ते आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठवला आहे.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने SIT आणि CID ची स्थापना केली होती. शनिवारी या प्रकरणात सीआयडीने १८०० पानी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याच समोर आलय.
संतोष देशमुख यांची ज्या निदर्यतेने, क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमधून आरोपींचे चेहरे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे ८ फोटो आणि १५ व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले आहे.अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.