भारताच्या लक्झरी कार बाजारात मोठी घडामोड

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये 'बेंटले'चा समावेश

2

मुंबई, ९ जुलै २०२५ – Bentley India launch News भारतातील लक्झरी कारप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAIVIPL) ने आजपासून ‘बेंटले’ या प्रतिष्ठित ब्रिटिश लक्झरी कार ब्रँडचा अधिकृतपणे त्यांच्या ग्रुपमध्ये सहाव्या ब्रँड म्हणून समावेश केल्याची घोषणा केली आहे.

१ जुलै २०२५ पासून SAIVIPL देशभरात बेंटले कारच्या आयात, विक्री व सेवा यांसाठी अधिकृत संस्था ठरली आहे. या निर्णयामुळे भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या अतिश्रीमंत ग्राहक वर्गाच्या लक्झरी आणि परफॉर्मन्स कारच्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील.

नव्या व्यवस्थेअंतर्गत, ‘बेंटले इंडिया’ ही SAIVIPL अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेली कंपनी संपूर्ण विक्री, विपणन आणि विक्रीनंतरच्या सेवा हाताळणार आहे. ब्रँडच्या भारतीय धोरणाची जबाबदारी देखील या कंपनीकडे असणार आहे.(Bentley India launch News)बेंटले इंडियाच्या ब्रँड डायरेक्टरपदी अबे थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली असून, भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या अनुभवाचा ब्रँडच्या यशात मोलाचा वाटा राहणार आहे.

बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली या प्रमुख शहरांमध्ये बेंटलेचे तीन नविन डीलरशिप्स सुरू करण्यात येणार आहेत. या शोरूम्सद्वारे बेंटलेची अतुलनीय डिझाईन, परफॉर्मन्स आणि परंपरागत ब्रिटिश कारागिरी यांचा संगम ग्राहकांना अनुभवता येईल.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, “बेंटलेचा आमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश होणे हे गौरवाचे आणि ऐतिहासिक पाऊल आहे. भारतात उच्चस्तरीय लक्झरी वाहनांची मागणी वाढत असून, बेंटले ही मागणी उत्तम प्रकारे पूर्ण करेल. अबे थॉमस हे भारतीय बाजारपेठेचे जाणकार असून, ते बेंटलेला नवीन उंचीवर घेऊन जातील, याची आम्हाला खात्री आहे.”

विक्री, मार्केटिंग आणि डिजिटल विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जान ब्युरेस म्हणाले, “बेंटलेसारख्या ब्रँडला भारतात आणण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. युएचएनआय (Ultra High Net-worth Individuals) सेगमेंटला याचा निश्चित फायदा होईल.”

बेंटले गेली दोन दशके भारतात सक्रिय असून, नेहमीच ऑटोमोटिव्ह परिपूर्णतेचा उच्च निकष कायम ठेवला आहे. आता SAIVIPL समूहाच्या पाठबळामुळे या ब्रँडला भारतात आणखी दृढ स्थान मिळेल आणि ग्राहकांना मालकीच्या संपूर्ण प्रवासात जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!