“जंगली रमी पे आओ ना महाराज!”– रोहित पवारांचा कोकाटेंवर घणाघात

राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री रमी खेळण्यात व्यस्त!

0

मुंबई, २० जुलै २०२५ – Rohit Pawar Manikrao Kokate राज्यात गंभीर शेती संकट आणि दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत असतानाही, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एक्स (माजी ट्विटर) वर शेअर करून संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओत कोकाटे सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळताना स्पष्ट दिसत आहेत. यावर रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटले, “जंगली रमी पे आओ ना महाराज!” – सरकारला शेतकरी, शेती व कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर काहीही करता येत नाही, कारण प्रत्येक निर्णय भाजपशी विचार करून घ्यावा लागतो. त्यामुळे हातात काही काम न उरल्याने मंत्री आता गेम खेळत बसलेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

(Rohit Pawar Manikrao Kokate)रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यातील विदारक वास्तव मांडले. त्यांनी म्हटले की, “राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जमाफी, पिकविमा, हमीभाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार गप्प आहे. शेतकरी आक्रोश करत आहेत, मात्र सरकार मात्र मौन बाळगत आहे.”

ते पुढे म्हणाले, “कधी गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवर येणार महाराज? हा आर्त सवाल आता सरकारला ऐकायला हवा. खेळ थांबवा, कर्जमाफी द्या – राज्याची खरी गरज आहे.”

या टीकेमुळे सत्ताधारी अजित पवार गट आणि भाजप अडचणीत सापडू शकतात. शेतकरी प्रश्न, आत्महत्या, पिकविमा आणि कोकाटेंचा वादग्रस्त व्हिडिओ या सर्व गोष्टी आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करू शकतात.
आता माणिकराव कोकाटे या टीकेला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!