मुंबई-नाशिक महामार्गाची डागडुजी होईपर्यंत टोलवसूली थांबवा -उपमुख्यमंत्री अजित पवार 

मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत झालेल्या बैठकीत झाला निर्णय 

0

मुंबई,दि,२ ऑगस्ट २०२४ – नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा व प्रमुख मार्ग आहे. राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूलांच्या कामासह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठक घेतली होती. यात पुढील १० दिवसांच्या आत मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय. तसेच जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्तावसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना  देण्यात आला आहे.

Mumbai- Nashik Highway/Stop toll collection till Mumbai-Nashik highway is repaired - Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई – नाशिक या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. तसंच त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणं आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्र, या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश बैठकीत दिले.

मागील काही वर्षांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर दर्जोन्नती, रुंदीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशी विविध कामं सुरु आहेत. महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत. काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यांचा दर्जा, त्यावरील खड्डे, वाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणं आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीनं तातडीनं उपाययोजना राबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीं सोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश बैठकीत दिले.

बहुतांश वेळा वाहतूक कोंडीत वाहनं खराब झाल्यामुळे पाठीमागच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. खराब झालेले वाहन तातडीनं दूर करणं आवश्यक असतं. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ४० टनाच्या क्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी एनएचएआय आणि एमएसआरडीसीनं वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कार्यक्षम वाहूतक व्यवस्थेसाठी या महामार्गावरील रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करावी. वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घेण्यात यावी. एमएसआरडीसीनं वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डन यांना गणवेश द्यावा. त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईल, असं सूचित केलं.

ज्याठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्गाची कामं सुरु आहेत, त्याठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित होत असल्याचं पाहायला मिळतं. यावर उपाययोजना करण्यासाठी यापुढे कामांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे आधीच्या रस्त्याच्या उंचीच्या समप्रमाणात पर्यायी रस्ते तयार केले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या अटींची पूर्तता करणं बंधनकारक करूनच महामार्गावरील कामांना परवानगी द्यावी,अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1818944730853707880

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!