‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची भन्नाट कमाल पाककृती!

0

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२५ Vada Pav Movie मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे वडापाव’. महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीबोळात आपला अस्सल खाद्यपदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला वडापाव आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर आणि कलाकारांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना आधीच भुरळ घालत असून, सोशल मीडियावरही ‘वडापाव’ची चर्चा जोमाने सुरू आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी उपक्रम आयोजित होत आहेत. त्यातच रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज, मुंबई यांनी ‘वडापाव’च्या संपूर्ण टीमला एका खास कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व टॅलेंटेड शेफ्सनी एक भन्नाट गिफ्ट साकारले तब्बल साडे सात किलो वजनाचा वडापाव!

भव्य वडापाव पाहून टीम थक्क(Vada Pav Movie)

सामान्यतः आपण चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये हाताच्या मुठीत मावेल असा वडापाव खातो. पण कॉलेजच्या शेफ्सनी कल्पनाशक्ती आणि कौशल्याचा अद्भुत मेळ घालून जेव्हा इतक्या मोठ्या आकाराचा वडापाव तयार केला, तेव्हा ‘वडापाव’ चित्रपटाची संपूर्ण टीम आश्चर्यचकित झाली. कलाकारांनी या वडापावचा आस्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही.

या खास प्रसंगी दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनेते अभिनय बेर्डे, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, तसेच निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन, मौसीन खान आणि डॉ. महेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.

“हा खरंच भन्नाट सरप्राईज” प्रसाद ओक

या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,“इतका मोठा वडापाव बनवणं हे खरंच अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. पण या शेफ्सनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली आणि आमच्यासाठी साडे सात किलोचा वडापाव तयार केला, ते कौतुकास्पद आहे. आज आम्हाला हा कुरकुरीत, भव्य आणि चविष्ट वडापाव भेट म्हणून मिळाला. यासाठी मी संपूर्ण टीमतर्फे कॉलेजमधील शेफ्स व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही आज वडापावचा आस्वाद घेतला, आता येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाच्या रूपाने खरी भेट देणार आहोत.”

विद्यार्थी-शेफ्सचं कौशल्य उठून दिसलं

या उपक्रमातून विद्यार्थ्यांची पाककला आणि त्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना योग्य व्यासपीठ मिळालं. खाद्यपदार्थाची आवड, त्यावर केलेलं प्रयोगशील काम आणि क्रिएटिव्हिटीचा संगम यामुळे ‘वडापाव’चे प्रमोशन एका वेगळ्याच पद्धतीने पार पडलं. या अनोख्या उपक्रमाची चर्चा केवळ कॉलेजपुरती मर्यादित न राहता आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चित्रपटाची ताकदवान स्टारकास्ट

वडापाव’ चित्रपटात दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांसारखे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांचा अभिनय, संवादफेक आणि त्यांच्या भूमिकांची रंगत प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.

निर्मितीमागील दमदार टीम

हा चित्रपट एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला आहे.

निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून, सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत.

सिनेमॅटिक किडा या बॅनरअंतर्गत साकारलेल्या या चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे यांनी केले आहे, तर लेखनाची जबाबदारी सिद्धार्थ साळवी यांनी पार पाडली आहे.

२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या ‘वडापाव’ची चर्चा प्रत्येक ठिकाणी रंगली आहे. गाणी आणि ट्रेलरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा आणि भावनांचा मिलाफ असलेला हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांसाठी हा एक चविष्ट सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!