प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; ‘पिंजरा’तील अजरामर नर्तकीला अखेरचा निरोप

0

मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२५ Sandhya Shantaram Passed Away मराठी चित्रपटसृष्टीतील ‘पिंजरा’ या अविस्मरणीय चित्रपटातील नर्तकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९७ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून आजारी असलेल्या संध्या यांचे काल रात्री निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्ही. शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या संध्या शांताराम या स्वतःच्या अभिनय, नृत्यकौशल्य आणि व्यक्तिमत्त्वामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या होत्या. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे कार्य सुवर्णकाळाचा महत्त्वाचा अध्याय ठरले.

मुलाने दिली माहिती (Sandhya Shantaram Passed Away)

चित्रपट दिग्दर्शक आणि व्ही. शांताराम यांचे पुत्र किरण शांताराम यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. “संध्या ताई गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होत्या. काल रात्री त्यांचे निधन झाले आणि आज सकाळी अंत्ययात्रा पार पडली,” असे त्यांनी सांगितले.

राजकीय व चित्रपटसृष्टीतून शोक

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक्स (X) अकाऊंटवर संध्या शांताराम यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले भावपूर्ण श्रद्धांजली! पिंजरा चित्रपटातील नायिका संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषतः ‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांची अजरामर भूमिका कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”सोशल मीडियावर अनेक कलाकार, दिग्दर्शक व रसिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

संध्या शांताराम यांचा चित्रपट प्रवास

संध्या शांताराम या नृत्यप्रधान भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री होत्या. १९६० च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टप्पा ठरला. शाळेतील शिक्षक व तमाशा फडातील नर्तकी यांच्यातील प्रेमकथेत त्यांनी साकारलेली भूमिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.

‘पिंजरा’तील बहारदार नृत्य आजही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला. ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयात नृत्यकौशल्याची झलक नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत राहिली.

सिनेसृष्टीतील मोठी पोकळी

संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकेकाळी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या दिग्गज अभिनेत्री आता कायमच्या दूर गेल्या असल्या तरी त्यांच्या अभिनयाची आणि नृत्याची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!