
मुंबई, दि. ११ नोव्हेंबर २०२५ – Asambhav Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराच्या नव्या अध्यायाची सुरुवात करणारा ‘असंभव सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. दिग्दर्शक सचित पाटील (Sachit Patil) यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील रहस्यपूर्ण वातावरण आणि अप्रतिम दृश्यसौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले आहे.
नैनितालच्या गूढ दऱ्यांमध्ये उलगडणारी कथा(Asambhav Marathi Movie)
‘असंभव’चा ट्रेलर नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये घडणाऱ्या एका गूढ आणि थरारक घटनांवर आधारित आहे. शुभ्र धुक्यात दडलेली हवेली, भूतकाळातील अघटित प्रसंग आणि वर्तमानात उलगडणारे गूढ प्रसंग — हे सगळं प्रेक्षकांना एका अनोख्या रहस्यजगात घेऊन जातं. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममधून “काहीतरी मोठं आणि अनपेक्षित घडणार आहे” अशी जाणीव होते.
🎭 कलाकारांच्या अभिनयाने वाढवला थरार
या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी यांसारखे चार ताकदवान कलाकार एकत्र झळकणार आहेत. मुक्ताच्या नजरेतील भीती, प्रियाचे गूढ वर्तन, सचितचा सत्याच्या शोधातील प्रवास आणि संदीप कुलकर्णींची गूढ उपस्थिती — हे सगळं प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारं आहे.

🎬 दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा दृष्टिकोन
दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात,
“‘असंभव’मधून पुनर्जन्म, रहस्य आणि भावनांचा संगम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटात पुनर्जन्माची संकल्पना विरळाच दिसते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ ठसे उमटवेल.”
निर्माते नितीन वैद्य म्हणाले,
“हा केवळ रहस्यपट नाही, तर नात्यांचा आणि भावनांचा प्रवास आहे. प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांनी अनुभवावा, हेच आमचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे ‘असंभव’ हा केवळ चित्रपट नसून एक अनुभव ठरणार आहे.”
🎥 तांत्रिक बाजू आणि निर्मिती
‘असंभव’चं दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून, सह-दिग्दर्शनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्री यांनी सांभाळली आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी निर्मिती केली आहे. तसेच एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तसेच पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.
रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या या थरारक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी तयार राहा — ‘असंभव’ २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.


