क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ; मंत्रिपदावर टांगती तलवार?

सदनिका गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा कायम

1

नाशिक | १६ डिसेंबर २०२५ Manikrao Kokate News राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजकीय अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी देण्यात येणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा यापूर्वी सुनावण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने कोकाटेंना मोठा धक्का बसला आहे.

अधिवेशनातील वाद आणि पदभार बदल(Manikrao Kokate News)

गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकतेच विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर त्यांनी स्पष्टीकरण देत, आपण गेम खेळत नसून मोबाईलवर पॉप-अप आले होते, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील कृषिमंत्रीपद काढून घेऊन क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

विरोधकांचा राजीनाम्याचा दबाव वाढणार?

प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरच विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्याने, आगामी काळात सरकारवर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे सदनिका घोटाळा?

सुमारे ३० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्या होत्या. मात्र, हे वाटप नियमबाह्य आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आणि अखेर न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्य… […]

Don`t copy text!