prsanna

नाशिक नाट्य परिषदेची वाटचाल आहिस्ते कदम: मात्र कलाकारांच्या मनावर दाटले ढग …

सभासदांना सूचना न देता वार्षिक सभा ? नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांची नाराजी !

0

अभय ओझरकर /दिगंबर काकड

(Nashik Natya Parishad News) अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या गुरुवारी, दि. २५ रोजी होणार असून सभेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप बहुसंख्य सभासदांना कोणत्याही प्रकारची अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही, ही गंभीर बाब समोर आली आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनेक सभासद गुरुवारी होणाऱ्या सभेबाबत पूर्णतः अनभिज्ञ असून त्यांना ही माहिती वर्तमानपत्रातून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. काही सभासदांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “नाट्य परिषदेची सभा होणार आहे, याची आम्हाला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

यापूर्वी सभासदांना पत्राद्वारे वार्षिक सभेची सूचना देण्याची पद्धत होती. मात्र आता खर्च वाचवण्याच्या कारणावरून पत्रव्यवहार टाळल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वापर करून किमान व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टद्वारे तरी सभेची माहिती देणे सहज शक्य असताना तसे का करण्यात आले नाही, असा थेट सवाल तरुण रंगकर्मी उपस्थित करत आहेत.

“मुंबईचा आदेश असल्यामुळे पत्रव्यवहार करण्यात आला नाही,” असे कारण पुढे केले जात आहे. मात्र, या संदर्भात नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्याशी संपर्क साधला असता, जनस्थानशी बोलताना त्यांनी सांगितले की, “खर्च वाचवण्यासाठी आम्ही वार्षिक सभेची माहिती वर्तमानपत्रांतून देत असतो. त्या बातम्या प्रसिद्धही झाल्या आहेत.”

मात्र, एखादी नोंदणीकृत संस्था अस्तित्वात आल्यानंतर वार्षिक सभेचा अजेंडा, तारीख, वेळ व ठिकाण याची अधिकृत माहिती सभासदांना देणे हे कायदेशीर व संस्थात्मकदृष्ट्या क्रमप्राप्त असते. मग खर्च वाचवायचा असेल तर हा संदेश व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट लिस्टवर का पाठवण्यात आला नाही? याबाबत काही ठराव झाला असेल तर त्याची नोंद मिनिट्समध्ये आहे का? आणि तो ठराव सभासदांना कधी व कसा कळवण्यात आला? असे प्रश्न अनेक रंगकर्मी ठामपणे विचारत आहेत.

दरम्यान, नाशिक शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांहून अधिक असताना, एवढ्या मोठ्या सांस्कृतिक शहरात अखिल भारतीय नाट्य परिषदेचे केवळ सुमारे १४०० सभासद असणे ही बाबही आत्मपरीक्षणाची गरज दर्शवणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नाशिकमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ असून, त्याच धर्तीवर दोन किंवा तीन स्वतंत्र अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा स्थापन करता येऊ शकतात, असे काही तरुण रंगकर्मी सुचवत आहेत. सीबीएसचा मध्यवर्ती भाग वगळता इंदिरानगर परिसरात अनेक ज्येष्ठ व दिग्गज कलावंत आहेत, पंचवटी भागात मोठ्या प्रमाणावर तरुण रंगकर्मी सक्रिय आहेत, तर नाशिक रोड भागात व्यावसायिक रंगभूमीवर नाव कमावलेले कलाकार आहेत.

जर नाट्य परिषदेच्या शाखा या भागांमध्ये वाढवल्या गेल्या, तर स्थानिक रंगकर्मींना त्यांच्या भागातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेता येईल. त्याचप्रमाणे सभासदसंख्या वाढून संस्थेचा लोकसहभाग वाढेल आणि नाशिकच्या सांस्कृतिक विकासाला निश्चितच अधिक बळ मिळेल, असा ठाम विश्वास रंगकर्मी व्यक्त करत आहेत.

“खर्च वाचवण्याच्या नावाखाली सूचना थांबवण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही” प्रशांत दामले (Nashik Natya Parishad News)

साभार आजचा महाराष्ट्र टाइम्स 21 dec 2025

खर्च कमी व्हावा म्हणून पत्रव्यवहार करू नये किंवा केवळ वर्तमानपत्रात बातम्या देऊन वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती द्यावी, अशा कोणत्याही सूचना आपण दिलेल्या नाहीत, असे ठामपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी स्पष्ट केले आहे.

जनस्थानशी बोलताना प्रशांत दामले यांनी परिषदेच्या कारभाराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “सभासद ही संस्थेची खरी ताकद आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, अजेंडा आणि मागील सभेची मिनिट्स सभासदांना देणे हे केवळ नैतिक नव्हे, तर संस्थात्मकदृष्ट्याही बंधनकारक आहे,” असे ते म्हणाले.

“खर्च वाचवण्याच्या नावाखाली सभासदांशी संवाद तोडण्याचा अधिकार कुणालाही नाही. पत्रव्यवहार न करणे किंवा केवळ पेपरमध्ये बातमी देणे, ही परिषदेची अधिकृत भूमिका कधीच नव्हती आणि आजही नाही,” असे दामले यांनी ठाम शब्दांत सांगितले.

नाशिक शाखेत सभासदांना वार्षिक सभेची माहिती वेळेवर न मिळाल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला. “या प्रकरणात कुठेही हलगर्जीपणा, टाळाटाळ किंवा नियमबाह्य कारभार झालेला आढळून आला, तर संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाईल आणि आवश्यक ती कारवाईही करण्यात येईल,” असे त्यांनी जनस्थानशी बोलताना सांगितले.

“अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद . ही एक नोंदणीकृत संस्था आहे आणि तिचा कारभार नियम, पारदर्शकता आणि सभासदांच्या विश्वासावर चालतो. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असा ठाम संदेश अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिला आहे.

या सर्व कारभारामुळे मराठी नाट्य चळवळीची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीबाबत शहरातील रंगकर्मींत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, ही संकल्पना काही पदाधिकाऱ्यांकडून बळजबरीने लादली जात असल्याचा आरोप अनेक कलाकारांकडून केला जात असून, याविरोधात यंदा उघडपणे बदलाची मागणी पुढे येत आहे.

सन २०२० ते २०२५ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. त्या वेळी १९ सदस्यांची कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली होती. मात्र, या कार्यकाळात कथित मनमानी कारभारामुळे कार्यकारिणीतील अनेक सदस्यांनी राजीनामे दिल्याचे वास्तव आहे. त्या निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले किंवा त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले, असा प्रश्न आजही उपस्थित केला जात आहे. त्यानंतर काहींना कार्यकारिणीत संधी देण्यात आली, तर एका कलाकाराला बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, तेथेही त्याच प्रकारच्या कारभारामुळे अखेर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.

याच पार्श्वभूमीवर, यंदाही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र, “यावेळी नाशिकचा कलाकार बदलासाठी तयार आहे,” असा सूर अनेक रंगकर्मींच्या बोलण्यातून उमटत आहे. नाट्य क्षेत्रात सक्रिय असलेल्या कलाकारांची संख्या मोठी असताना, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची सभासद संख्या केवळ सुमारे १४०० इतकीच का आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही ज्येष्ठ रंगकर्मींच्या मते, संभाव्य विरोध वाढू नये म्हणून सभासद नोंदणी थांबवण्यात आली आहे. याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नसली, तरी ही चर्चा रंगकर्मींत उघडपणे होत आहे.

नाट्य परिषदेच्या प्रत्येक महिन्याच्या सभांची माहिती मोजक्या सभासदां पुरतीच मर्यादित राहते, असेही आरोप आहेत. त्यामुळे निर्णयही काही निवडक लोकांमध्येच घेतले जातात, असा समज पसरत आहे. विद्यमान कार्यकारिणीत दोन गट पडल्याचे स्पष्टपणे जाणवत असून, उपक्रमांबाबत दोन्ही गटांत मतभेद असल्याचे अनेक कलाकार सांगतात. या अंतर्गत वादाचा परिणाम नाट्य परिषदेच्या कामकाजावर होत असल्याची भावना आहे.

पुरस्कारांच्या बाबतीतही अध्यक्ष व कार्यवाह यांचा अतिरेक हस्तक्षेप असल्याचे बोलले जाते. काही पुरस्कार हे ठरावीक, जवळच्या किंवा मर्जीतील लोकांनाच दिले जात असल्याची चर्चा नाशिकच्या नाट्यवर्तुळात सुरू आहे. अधिकृत स्पष्टीकरण नसले, तरी पुरस्कार यादीकडे पाहता हे आरोप बळावत असल्याचे अनेकांनी दबक्या आवाजात सांगितले आहे.

नाट्य परिषदेने सुरू केलेल्या अभिवाचन उपक्रमालाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक रंगकर्मी या उपक्रमापासून दूर राहिले आहेत. यामागे, कार्यकारिणीतील पदाधिकारी किंवा त्यांच्या जवळच्या कलाकारांनाच अभिवाचनाच्या संधी दिल्या जातात, असा आरोप कालवांकडून केला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम सर्वांसाठी खुला न राहता मोजक्यांपुरताच मर्यादित झाल्याची भावना कलाकार व्यक्त करतात.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांचा सन्मान करण्याची परंपरा नाट्य परिषद जपत आली आहे. मात्र, या गौरव समारंभांमध्ये कार्यकारिणीतील मोजकेच सदस्य उपस्थित राहतात आणि अध्यक्ष व कार्यवाह अनेकदा अनुपस्थित असल्याचे चित्र दिसते, असे कलाकारांचे म्हणणे आहे. यामुळे सहभागी कलाकारांमध्ये नाराजी निर्माण होते.

नाट्य परिषदेचा हॉल हा नाशिक महानगरपालिकेचा असून, नाशिकच्या रंगकर्मींना नाटकाच्या सरावासाठी तो उपलब्ध करून द्यावा, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र, प्रत्यक्षात कलाकारांनी मागणी केल्यास त्यांना स्पष्ट नकार दिला जातो, असा अनुभव अनेकांनी सांगितला. विशेष म्हणजे, दर महिन्याला याच हॉलमध्ये नाशिक कवी संस्थेतर्फे काव्यवाचन उपक्रम घेतला जातो आणि त्यासाठी नाट्य परिषदेकडून शुल्क आकारले जाते. मग नाट्य सरावासाठी रंगकर्मींना जागा का दिली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.

नाट्य परिषदेच्या कार्यालयात नाशिकच्या कलाकारांसाठी अभ्यासाकरिता अनेक दर्जेदार व जुनी नाट्यसंहिता उपलब्ध आहेत. मात्र, त्या आजही वापरात न आणता धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. अभ्यास, संशोधन आणि नव्या पिढीसाठी हे साहित्य खुले करणे गरजेचे असल्याचे मत रंगकर्मी व्यक्त करतात.

नाट्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अनंत कुबल एकांकिका स्पर्धेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्पर्धकांची निवड तसेच निकाल जाहीर करताना काही पदाधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जातो, असे नाशिक व बाहेरील रंगकर्मी सांगतात. या आरोपांमुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नाशिकच्या नव्या कलाकारांसाठी नाट्य परिषदेकडून कोणत्याही प्रकारच्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे किंवा मार्गदर्शन कार्यक्रम राबवले जात नाहीत, ही खंत अनेकांनी व्यक्त केली. शहरात नवोदित कलाकारांची संख्या मोठी असताना, मातृसंस्थेने पुढाकार न घेणे हे नाट्य चळवळीच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, यंदाची निवडणूक ही केवळ पदांसाठीची लढत न राहता, नाशिकच्या नाट्य चळवळीची दिशा ठरवणारी ठरेल, असे चित्र आहे. बिनविरोध निवडणुकीपेक्षा खुली, पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी, हीच अपेक्षा नाशिकच्या रंगकर्मींतून व्यक्त होत आहे. “नाट्य परिषद ही काही मोजक्यांची मक्तेदारी नसून, ती सर्व कलाकारांची आहे,” अशी भावना यानिमित्ताने अधिक ठळकपणे पुढे येत आहे.

टीप:(Nashik Natya Parishad News)

ही बातमी किंवा लेख कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याला लक्ष्य करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही. मात्र, एखादी नोंदणीकृत संस्था चालवताना आपण सभासदांच्या विश्वासावर त्या पदावर आहोत, ही मूलभूत जाणीव सातत्याने ठेवणे अत्यावश्यक आहे.सभासदांनी मतदान करून, विश्वास ठेवून आणि अपेक्षा बाळगून ज्या पदावर आपल्याला बसवले आहे, त्या पदाला न्याय देणे ही केवळ जबाबदारी नव्हे, तर कर्तव्य आहे. संस्थेचा कारभार नियम, पारदर्शकता आणि संवादावर चालतो. सभासदांना माहिती न देता, निर्णय प्रक्रिया अस्पष्ट ठेवून किंवा संवादात दुरावा निर्माण करून संस्था चालवता येत नाही.ही मांडणी कोणाविरुद्ध नाही, तर संस्थेच्या आरोग्यासाठी आहे. चुकीकडे बोट दाखवणे हा विरोध नसून, संस्थेचा विश्वास वाचवण्याचा प्रयत्न आहे. आज प्रश्न विचारले जात आहेत, कारण संस्था टिकावी, वाढावी आणि सभासदांचा सहभाग वाढावा, हीच अपेक्षा आहे.सभासदांचा विश्वास हेच संस्थेचे खरे भांडवल आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे आणि वेळेत सुधारणा करणे हाच या लेखाजोख्याचा उद्देश आहे.–अभय ओझरकर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!