मुंबई-सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील वन अँड ओन्ली ड्रामा क्वीन स्वरा जोशी ही फक्त आपल्या गाण्यानेच नाही तर कार्यक्रमातील इतर स्पर्धक आणि परीक्षकांची हुबेहूब नक्कल करून सर्वांचं मनोरंजन करते. तसंच झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी हिने आपल्या निरागस आणि गोड अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अल्पावधीतच परी ही संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. ड्रामा क्वीन स्वरा आणि नटखट परी म्हणजेच मायरा, या दोघी एकत्र आल्या तर?
परी आणि स्वरा एकत्र येणार म्हणजे धमाल आणि त्याचसोबत अनलिमिटेड मनोरंजन होणार यात शंकाच नाही. या दोघी लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकत्र सज्ज होणारआहेत.यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची धुरा नक्की कोण सांभाळणार परी कि स्वरा यासाठी दोघींमध्ये चुरस रंगताना दिसतेय. नुकताच या वाहिनीवर स्वरा आणि परी यांचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा तितक्याच उत्साहात साजरा होणार आहे. यंदा झी मराठी अवॉर्ड्सच्या सेलिब्रेशनचा उत्साह द्विगुणित होणार आहे कारण नुकतंच झी मराठीच्या परिवारात अनेक नव्या मालिकांची एंट्री झाली आहे. मन झालं बाजींद, माझी तुझी रेशीमगाठ, मन उडु उडु झालं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?, ती परत आलीये या नवीन मालिकांची आधीच्या मालिकांसोबत चुरस रंगणार आहे. यावर्षी स्वरा आणि परीच मजेदार सूत्रसंचालन यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे डोळे आता या पुरस्कार सोहळ्याकडे लागले आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.