मुंबई-बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या आठ जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रु अनावर झाले. सुरेखा कुडची म्हणाल्या, “ या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितिमुळे होतं तसं. पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. पण या घरामध्ये काहीतरी जादू आहे”. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले.
बिग बॉस मराठी सिझन ३ च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये आले होते बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय, TOP २ स्पर्धक ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि दुसरे स्थान पटकावलेली नेहा शितोळे. त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी केली, रोज डे सेलिब्रेट केला. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली तर चुगली बूथद्वारे सोनाली पाटीलला तिच्याविरुध्द सदस्य जे बोलत होते ते तिच्या फॅनने सांगितले. जय आणि आदिशचा रोमॅंटिक डान्स बघायलामिळाला.तर, सदस्यांनी एकमेकांनबद्दल असलेल्या तक्रारी सदस्यांना सांगितल्या.
बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घुमला “ आजीचा” आवाज
बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सुरेखा कुडची यांना घराबाहेर जावे लागले. आता सुरू झाला नवीन आठवडा … बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार नवे टास्क … या आठवड्यात बिग बॉस घरातील सदस्यांना खास सरप्राईझ देणार आहेत. कालसमोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये स्वागत केले एका खास व्यक्तीचे. सदस्यांचा आनंद त्या घोषणेनंतर गगनात सामावेना. सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये धावत गेले कारण तितकी खास, जवळची व्यक्ति घरामध्ये आली त्यांना दिसली. घरामध्ये आवाज घुमला आजीचा! हो आजीचा. “ कारट्यांनो किती धुडगूस घालता रे. हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला”.
प्रत्येक नातं खास असतं. प्रत्येक नातयात काही देवाण घेवाण सुरू असते. पण आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ति असते जी आपल्याला प्रत्येक वेळेला निरपेक्ष भावनेने काही ना काही देत असते आणि ती व्यक्ति म्हणजे आपली आजी. आई वडील ओरडल्यावर तीच असते जी आपल्याला समजावते. तीच असते जी वेळप्रसंगी आपल्यासारखी लहान होऊन आपल्याशी खेळते, मैत्री करते आणि लाड पुरवते. खोडी केल्यावर मायेने धपाटा देखील घालते. बिग बॉस आज घरामध्ये आजीचे मनपूर्वक स्वागत करणार आहेत. बघूया घरामध्ये काय धम्माल मस्ती घडते. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री९.३०वा.कलर्स मराठीवर.