डॉ. स्वप्नील तोरणे
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीमध्ये साहित्य संमेलन ही महत्वाची घटना असते. वाचकांचा, रसिकांचा सहभाग यास मोठया प्रमाणावर लाभत आहे. विसाव्या शतकाने सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाच्या अनेक चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन समृध्द झाले आहे. या पैकीच एक म्हणजे साहित्य संमेलन. आज याला आलेले महासंमेलनाचे स्वरुप डोळे दिपवून टाकणारे आहे. सुमारे दीड शतकाची वाटचाल असलेल्या परंपरेचा साहित्यरथ आज ९४ व्या संमेलनाच्या उंबरठयावर आहे. या निमित्ताने डॉ. स्वप्नील तोरणे यांनी घेतलेल्या काही निवडक संमेलनांचा मागोवा…’’
नाशिक येथील संपन्न होत असलेले ९४ वे साहित्य संमेलन आहे. आजवर तब्बल त्र्यांनव मराठी साहित्य संमेलने दिमाखदार पध्दतीने वेगवेगळया ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली. अशा पद्धतीच्या सांस्कृतीक उपक्रमाचा हा विश्व विक्रमच असण्याची शक्यता आहे.
ही संमेलने आयोजित कोण करते ? याचा खर्च कोण करतो ? यांच्या कार्यक्रमाचे स्वरुप कसे ठरवले जाते ? या संमेलनाचे प्रमुख आयोजक कोण असतात असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य भाषाप्रेमीला पडतात. विशेषत्वाने संमेलनात प्रथमच हजेरी लावणाऱ्या रसिकाला सगळे स्वरूप पाहून निश्चितच मनात येत असता. प्रस्तुत लेखात याच काही प्रमुख बाबींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मराठी साहित्यसंस्थांमध्ये, किंबहुना साहित्यिक व साहित्यप्रेमी वाचक यांच्यामध्ये जवळीक साधणारे एक साधनभूत उत्सवी कार्य म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची वार्षिक अधिवेशने. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने १८७८ पासून अशी संमेलने भरविण्याची प्रथा पडली. आरंभीची चारपाच संमेलने ‘मराठी ग्रंथकार संमेलने’ या नावाखाली भरली. या लेखमालेच्या पहिल्याच भागात आपण याची सविस्तर माहिती घेतली.
पुढे कालानुसार ‘महाराष्ट्र’, ‘मराठी’ आणि ‘अखिल भारतीय मराठी’ असे संमेलनाचे नामांतरण होत गेले. ग्रंथकार संमेलने सुनियंत्रितपणे भरवली जावीत. त्याचं स्वरूप आणि उद्दिष्ट्य काटेकोर असावे अशी त्या काळच्या समाज धुरिणांची कळकळ होती. म्हणूनच साहित्याचा प्रसारार्थ बंगाली साहित्य परिषदेच्या धर्तीवर कायम स्वरूपाची संस्था असावी या हेतूने १९०६ च्या पुणे येथील चवथ्या ग्रंथकारसंमेलनात ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. परिषदेचे घटना- नियम तयार व्हायला आणि ते एकमत व्हायला १९१२ साल उजाडले. तब्बल सहा वर्षांनी अकोला संमेलनात घटना तयार झाली. तिचे घटनात्मक कार्य प्रथम मुंबईहून सुरू झाले. मूळच्या घटनेत आणि नियमांत काळानुरूप विवीध अनुभव आल्यावर अधूनमधून बदल झाले आहेत.
साहित्य परिषदेचे सर्वात मोठे कार्य म्हणजे १९०६ ते १९६४ पर्यतची साहित्यसंमेलने यांचे आयोजन.संयुक्त महाराष्ट्राच्या व्यापक आंदोलनानंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. लगेच पुढील वर्षी १९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद,औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्थाना एकत्र करण्यात आले. विभागीय संस्था असण्यापेक्षा त्यांची एकत्र शिखर संस्था असावी जेणेकरून त्या संस्थेमार्फत मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.
या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामान पोतदार हे होते.महामंडळामार्फत करण्यात आलेले भाषाविषयक पहिले काम म्हणजे व्याकरण व शुद्धलेखन हे होय.१९६२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरील मराठी भाषिक उपयोगात आणल्या जात असलेल्या मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले. तेच मराठी शुध्दलेखनाचे नियम होय. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. यशवंराव चव्हाण यांनी हे नियम महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वीकारले. महामंडळानी केलेले भाषाविषयक पहिले अतीशय महत्वाचे काम होय.
महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याच्या म.सा.प.च्या वतीने भरवली जात होती. या संमेलनांना महाराष्ट्र साहित्य संमेलन असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४ मध्ये मडगांव येथे झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला. या साहित्य संमेलनांचे अध्यक्ष कुसुमाग्रज हे होते. आपल्या भाषणात त्यांनी अतीशय रोखठोक मुद्दे मांडले आहेत. ते म्हणतात, ” साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचे अथवा साहित्य प्रेमी लोकांचेच संमेलन नव्हे, महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा हा प्रातिनिधिक मेळावाही आहे. नसेल तर व्हायला हवा, असे मला वाटते. संयुक्त महाराष्ट्राची उभारणी भाषेच्या तत्वावर झाली आहे. त्याबाबतीत साहित्य संमेलनाने जागरूकता दाखवली आहे. हीच जागरूकता यापुढेही कायम रहायला हवी. या दृष्टीने भाषेचा आणि भाषेच्या अनुरोधाने उद्भवणाऱ्या ईतर प्रश्नांचा विचार संमेलनात होणे आवश्यक आहे. ”
याचाच परिपाक म्हणजे १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन होय.प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमलेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे क्रम मात्र जुनाच चालू ठेवण्यात आला. आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर वापरले जात आहे.
महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या महाराष्ट्रालगतच्या ज्या साहित्य संस्था आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार करून त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रुपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले.
आजवरच्या त्र्यांनव संमेलनात सत्तेचाळीस संमेलन महामंडळाच्या माध्यमातून संपन्न झाले आहेत. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असणाऱ्या या संमेलनासाठी तेथील स्थानीक संस्था पुढाकार घेत असतात. नाशिकच्या संमेलनासाठी लोकहितवादी मंडळ या संस्थेने पुढाकार घेऊन महामंडळाला संमेलन नाशिक येथे आयोजीत करण्यात यावे असे आमंत्रण दिले. सर्वसाधारण लोकवर्गणीतून अश्या संमेलनांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पन्नास लाख रुपयांचा निधी संमेलन आयोजनासाठी सध्याच्या काळात दिला जात असतो. लोकप्रतिनिधी, बँका, उद्योगपती, व्यावसायीक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने निधी संकलन केले जाते. संमेलनात लागणारे स्टॉल्स, जाहिरातीत या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळते. या सगळ्यांतून साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. या सगळ्या प्रक्रियांमध्ये अनेक टिका देखील केल्या जातात. या टिका अयोग्य असतात असेही नाही. योग्य अयोग्य असे सूर काढण्यापेक्षा अधिक चांगले काय करता येईल याचा विचार, प्रश्नांची मांडणी आणि त्यांची सोडवणूक करून साहित्याच्या या गंगेला प्रवाहीत ठेऊ या..
डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
9881734838
स्वप्नील सर खूप माहितीपूर्ण लेख माला आहे. खूप छान