सोमवारपासून भुसावळ-इगतपुरी दरम्यान धावणार मेमू ट्रेन : प्रवाशांना दिलासा
असे असणार मेमू ट्रेनचे वेळापत्रक
नाशिक- गेल्या २२ मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली भुसावळ-देवळाली शटलला आता पर्याय उपलब्ध झाला असून सोमवार दिनांक १० जानेवारी पासून आता पॅसेंजर ऐवजी भुसावळ ते इगतपुरी दरम्यान मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय भुसावळ रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.या ट्रेन ची चाचणी गुरुवार आणि शुक्रवारी घेण्यात आली. सोमवार पासून भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेनला सुरुवात होणार आहेत. या गाडीला आरक्षित डबे असणार की नाही ? यासंदर्भात काहीच स्पष्टीकरण नाही. परंतु अजूनही या गाडीचे आरक्षण सुरू झालेले नाही.
सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.
ही मेमू ट्रेन आठ डब्यांची असणार असून या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व स्थानकांवर थांबत होती.मात्र हि ट्रेन त्यातील सात स्थानकांवर थांबणार नाही.
असे असणार मेमू ट्रेनचे वेळापत्रक
भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी ७ वाजता सुटेल. ७.२६ ला जळगाव ला पोहोचेल. १०. ०९ ला चाळीसगाव येथे पोहोचेल. १२.०८ ला मनमाड पोहोचेल व १.२३ ला नाशिक नंतर इगतपुरीला दुपारी ३ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९ वाजता सुटेल. नाशिकला १०.३० वाजता तर जळगाव येथे ती सायंकाळी ४.२७ ला पोहोचेल तर भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल.
या सात स्थानकांवर मेमू ट्रेन थांबणार नाही.
भुसावळ-देवळाली शटल सर्व स्टेशन वर थांबत होती.यातील ७ स्थानकांवर ही मेमू ट्रेन थांबणार नाही यात वाघळी,पिंपरखेड,हिस्वल,समीट,पीजन,ओढा,लहावीत यांचा समावेश आहे .
नाशिक-कल्याण कधी ?
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.