नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना पाच पट मोबदला मिळवून देणार – छगन भुजबळ

0

नाशिक – नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शासन बाधित शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाला दिले.

नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने आज पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी बाधित शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, केरू काळे, वासुदेव पोरजे, ज्ञानेश्वर काळे, अशोक आडके, योगेश काळे, प्रकाश आडके, सुकदेव आडके, मुकंद गोसावी, राजाराम शिंदे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात बाधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, मौजे नाणेगांव ता.जि.नाशिक येथे पुणे – नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व अधिग्रहीत शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरु आहे. सदर भूसंपादन हे गावातील २१.५ हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून बाधीत शेतकऱ्यांची जमिन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे.

तसेच रेल्वेलाईनमुळे शेतकऱ्यांच्या क्षेत्राची दोन ते तिन तुकडयात विभागणी होणार असल्याने त्या संपुर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होणार आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरीत संपुर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधीत होणाऱ्या पाईपलाईन पंचवीस मीटरवर क्रासिंग होण्याकरीता व्यवस्था असावी पाईपलाईन विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा.

बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या व्यतिरीक्त रेड झोन नसावा, गावातील रेल्वेमार्गातील बाधीत होणारे वागवहीवाटीचे रस्त्यांना क्रासिंग येणे जाण्याची योग्य ती व्यवस्था करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे केलेल्या आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.