एका तेजस्वी इतिहासाची स्मरण मैफल : वंदे मातरम्
'शब्दमल्हार' प्रकाशनातर्फे शुक्रवार, दिनांक २९ जुलै २०२२ आयोजन...
नाशिक – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘शब्दमल्हार प्रकाशन’ गृहातर्फे ‘वंदे मातरम्’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार, दिनांक २९ जुलै २०२२ या दिवशी सायंकाळी सहा वाजता कालिदास कला मंदिरात ही मैफल होणार आहे.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ या पाच कडव्यांच्या राष्ट्रगानाचे आज आपण फक्त एकच कडवे म्हणतो किंवा ऐकतो. या मैफलीत मात्र पाचही कडवी गायली जातात. या गीताला नव्याने सांगीतिक साज चढविण्यात आला असून अमोघ वाणीचे वरदान लाभलेल्या स्वानंद बेदरकर यांच्या ओजस्वी निरूपणातून हे गीत, त्या गीताची निर्मिती, त्याचे काव्यसौंदर्य, त्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यात असलेली ‘वंदे मातरम्’ची भूमिका उलगडत जाते.
गायक ज्ञानेश्वर कासार यांची संगीत संकल्पना लाभलेल्या या मैफलीत रागिणी कामतीकर आणि आशिष रानडे यांच्याकडून अनोख्या चालीत हे गीत ऐकायला मिळणार आहे. अनिल धुमाळ (कीबोर्ड), अनिल दैठणकर (व्हायोलिन), उमेश खैरनार (ऑक्टोपॅड) ओंकार अपस्तंभ, आदित्य कुलकर्णी (तबला) यांची साथसंगत लाभलेल्या या कार्यक्रमात विनोद राठोड यांची प्रकाशयोजना आहे.
एकाच गीतावर आधारित असलेला हा संपूर्ण कार्यक्रम आजवरच्या कार्यक्रमांपैकी अनोखा म्हटला जातो. एकाच वेळी शब्द-स्वर आणि वाद्य यांची मैफल रंगत जाते आणि रसिक एका तेजस्वी इतिहासाला आत्मसात करून बाहेर पडतो; असा या कार्यक्रमाचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे.