नाशिक,१९ सप्टेंबर २०२२ – लोकांना रंजक आणि बोधप्रद काहीतरी द्यावं हा उद्देश सुकन्या जोशी विवेक केळकर या दोघांनी मिळून गीतरामायणावर आधारित कार्यक्रम करू असा प्रस्ताव रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओचे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी यांचेसमोर मांडला. त्यांनी तात्काळ होकार देत त्याचदिवशी १ जानेवारी २०२१ ला हा कार्यक्रम नेमका कसा असेल यासाठी प्रास्ताविक स्वरूपाचा पहिला भाग ध्वनिमुद्रितही झाला. सुकन्या जोशी यांनी ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडसे यांच्या चिरंजीवांच्या म्हणजेच आनंद माडगूळकर, शरदकुमार माडगूळकर आणि श्रीधर फडके यांच्या अनुमतीने कार्यक्रम करायचं निश्चित केलं. ललकारचे रविन्द्र आपटे, दत्ता मारूलवकर यांचे लेख धनंजय भोसेकर, कॅनडा, अवघ्या आशा श्री रामार्पणचे संपादक प्राध्यापक मिलिंद जोशी सकाळची ज्योतीने तेजाची आरतीची संपादिका अमृता संभूस डॉ. भाग्यश्री मुळे, अरुणा ढेरे, प्रविण दवणे, गीत रामायणाचे अभ्यासक अरुण गोडबोले, किरण फाटक, गदिमा प्रतिष्ठान आदींची देखील त्यांनी लिहिलेल्या विवेचनासाठी अनुमती घेतली.
याशिवाय सुकन्या जोशी यांनी गीत रामायण आणि वाल्मिकी रामायणावरील सुमारे २८ संदर्भ पुस्तक, अनेक लेख तसेच लेखमाला यांचा अभ्यास करून ५६ भाग सादर केले. स्वतः केलेल्या कार्यक्रमात घडलेले किस्सेही सांगितले, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. विवेक केळकर यांनी केवळ तानपुराच्या साथीने गीत रामायणातील ५६ च्या ५६ गीते सादर केली. श्रीधर फडके, आनंद आणि शरद कुमार माडगूळकर तसच वसंत आजगावकर यांनी सांगितलेल्या प्रत्यक्ष आठवणींमुळे या कार्यक्रमात विशेष रंगत आली.
रेडिओ विश्वास चे मार्गदर्शक.विश्वास जयदेव ठाकूर,यांची संकल्पना व समन्वयक रुचिता ठाकूर यांनी यांचे नियोजन कार्यक्रमासाठी महत्वाचे ठरले. रेडिओ विश्वासच्या माध्यामातून सादर होणारा हा कार्यक्रम म्हणजे एक अनोखा उपक्रम ठरला. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. १२ देशातील रसिकांनी हा कार्यक्रम ऐकून लेखी किंवा व्हॉईस मेसेजेस द्वारा प्रतिक्रिया पाठवल्या अभिप्राय दिले. दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्याला मिळालेली भावपूर्ण, सुरेल गायकीची साथ आणि रेडिओ विश्वाससारख्या भारतातील लोकप्रिय कम्युनिटी रेडिओ या त्रयींच्या संगमातून कथा गीतरामायणाची या कार्यक्रमाची आनंद पर्वणी रसिक श्रोत्यांना मिळाली. बागेश्री पारनेरकर हिच्या उत्तम एडिटींगमुळे हा कार्यक्रम खूपच सुंदर सजला.