मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे
समाजामध्ये तसेच कुटुंबामध्ये होत असलेले कलह, भेदभाव, मतभेद, इर्षा, स्पर्धा, द्वेष, सूडबुद्धी, भांडण, स्वार्थी पणा, हाणामारी, आत्महत्या, घातपात आक्रमकता, हिंसा, हेवेदावे या सगळ्याच मूळ जर काही असेल तर ते आहे आपल्या प्रत्येकाचं वैचारिक दारिद्र्य. माणूस साक्षर असो कि निरक्षर, श्रीमंत असो वा गरीब, तो किती मोठया शहरात राहतोय कि गाव खेड्यातील आहे, यावर आपल्या आयुष्याचं यश आणि अपयश अवलंबून नसत तर ते अवलंबून असत आपल्या वैचारिक कुवतीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि कोणत्याही व्यक्ती कडे, घटनेकडे आपल्या पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनावर
यश म्हणजे फक्त प्रचंड पैसा, पद, नावलौकिक, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवणे नाही तर सर्वप्रकारची नितिमूल्य पाळून, प्रामाणिकपणे, तत्वाने, सत्याने, नैतिकतेने वाटचाल करुन स्वतःसोबतच इतरांचेही आयुष्य घडवणे. फक्त परिस्थिती ला दोष देत न राहता, फक्त एकमेकांवर ताशेरे न ओढता आयुष्याकडे समंजस दृष्टिकोनातून पाहिले तरच बऱ्यापैकी जगता येतं.
आपल्या समाजात, घरात, कुटुंबात, आपल्या जीवनात तसेच आजूबाजूला अनेक चुकीची लोकं आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, अप्रिय घटना घडतं आहेत, जे नकोय तेच समोर येतं आहे, जे हवं आहे जसं हवं आहे ते मिळत नाहीये, आवड आणि निवड याची सांगड घातली जात नाहीये. मनाविरुद्ध इच्छेविरुद्व अनेक गोष्टी स्वीकारायला लागत आहेत, आपल्यावर लादल्या जात आहेत, अपेक्षाभंग होत आहेत आणि त्यामुळे आपली मानसिकता बिघडते, चिडचिड होते, त्रागा होतो, जीव नकोसा होतो, संताप होतो, राग येतो, आत्मविश्वास ढासळतो.
अनेकदा आपण प्रचंड भावनांविवश होऊन आपल्या अश्रुंचा बांध फुटतो तर कधी आपल्या संयमचा कडेलोट होऊन आपण कोणत्याही खालच्या पातळीला देखील जातोय. कधी यातून बाहेर पडायला आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो तर कधी स्वतःला प्रचंड त्रास करुन घेतो.
आपल्या समोर असलेली समस्या समजून घ्यायला जरी आपल्याला भावना वापरावी लागली तरी पण समस्या सोडवायला लॉजिक म्हणजेच तर्क लागतोय आणि ते लॉजिक, तर्क आपल्या विचारातून येतं असते. प्रश्न समजावून घेण्यासाठी, इतरांना समजावून घेण्यासाठी, स्वतःला समजण्यासाठी भावना नक्कीच लागतात पण भावनेचा वापर करुन आपण प्रश्न सोडवू शकतं नाही. म्हणूनच आपली वैचारिक स्थिती सुधृढ, निकोप असणे महत्वाचे आहे. निकोप वैचारिक अवस्था आपल्याला तर्क वापरून प्रश्न सोडवायला मदत करते.
अनेक लोकांना आपली समस्या काय आहे हेच समजत नसत, तर ते उपाययोजना काय करणार??आपण का त्रासलो आहोत, आपल्या दुःखाच मूळ काय आहे, आपल्याला नेमक काय हवं आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक काय प्रयत्न केला आहे??? हे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करायला हवं.
आपल्या वाईट परिस्थिती ला इतरांना दोषी ठरवण खूप सोपं आहे, प्रथम कोणतीही समस्या आपली वैयक्तिक आहे कि कौटुंबिक आहे कि सामाजिक आहे, हे समजणे गरजेचे आहे.सामाजिक प्रश्न आपण वैयक्तिक पातळीवर पूर्ण सोडवू शकतं नाही पण आपलं शक्य तेवढं योगदान निश्चित देऊ शकतो. कौटुंबिक प्रश्न सोडवताना सुद्धा अनेकदा आपल्या वैचारिक दारिद्र्यामुळे आपण इतरांना दोष देण्यात, इतरांना सतत जबाबदार धरण्यात, इतरांना फक्त नाव ठेवण्यात, इतरांबद्दल चुकीच्या चर्चा करण्यात, अफवा पसरवण्यात आयुष्यातील अनेक वर्ष वाया घालवत राहतो.
कौटुंबिक पातळीवरील प्रश्न सोडवायला प्रत्येकाची सारखी विचारधारा अपेक्षित असते, एकत्रित आणि सातत्याने आणि शांतपणे संयमाने प्रयत्न आवश्यक असतात.वैचारिक दृष्टीने दरिद्री असलेले लोकं फक्त फालतू चर्चा करून, सतत एकमेकांना बोलून, बडबड करुन, सतत फक्त गाऱ्हाने, तक्रारी सांगून, परस्परांची निंदा करुन, अपशब्द वापरून गरळ ओकत राहतात त्यातून साध्य काहीच होत नाही. आपलं वैचारिक भान जर जागेवर असेल तरच कोणतीही त्रासदायक परिस्थिती बदलली जावू शकते. काही समस्या इतक्या गंभीर असतात कि त्यांना वरवर ची मलमपट्टी करुन उपयोग नसतो त्या मुळापासून उखडून काढाव्या लागतात. त्यासाठी आपलं मत, मन, विचार, उद्देश, कार्यप्रणाली अतिशय स्पष्ट असावी लागते. त्याचबरोबर आपली जिद्द, चिकाटी, निर्णय घेण्याची पात्रता, वाईट असलं चुकीचं असलं तरी सत्य स्वीकारून त्याला समोर जाण्याची मानसिक तयारी लागते.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील, आपल्या घराला होणाऱ्या त्रासाची, गंभीर समस्यांची जबाबदारी स्वतः घेऊन त्यातून आपणच मार्ग काढला तरच परिस्थिती थोडीफार बदलू शकते अन्यथा वर्षानुवर्षे आपण एकाच दुःखाला कवटाळून बसणार हे नक्की. नुसतंच वाह्यात बडबड करुन, झालेल्या, घडलेल्या चुकीच्या घटनांवर सतत उलटपालट बोलून , संबंधित सर्वाना कोसून, आणि बाष्कळ चर्चा करुन कोणताही प्रश्न मार्गी लागत नाही.
ज्यावेळी आपली दुःख, दुःखाची कारण, आपली त्रासदायक परिस्थिती अनेक वर्ष बदलत नाही, सातत्याने त्याच त्याच समस्या आपल्याला भेडसावतात तेव्हा हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि आपण आजपर्यंत यातून बाहेर येण्यासाठी काहीही कृती केलेली नाही. निव्वळ चर्चा करण्यात आपण आपला वेळ आणि श्रम वाया घालवले आहेत.
चर्चा जरूर करावी पण त्यातून काहीतरी निष्कर्ष काढता आला पाहिजे, काहीतरी निर्णय घेता आला पाहिजे, त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. अनेक ठिकाणी, अनेक जण कोणतंही संकट आलं, त्रास झाला, काही चुकीचं घडलं कि जोरात बोलून, ओरडा आरडा करुन, अवडंबर करुन मुळं प्रश्न बाजूला ठेऊन वेगळ्याच गोष्टीचा डंका पिटवताना दिसतात.
सरसकट सगळ्या विषयावर, सगळ्यांबद्दल एकत्र दिशाहीन बोलत सुटतात. संदर्भ हीन बोलणे, भलत्याच गोष्टी मध्ये आणणे, भलतेच संदर्भ मध्ये घुसवणे, कोणाही बद्दल काहीही वाच्यता करत राहणे, अर्धवट माहितीच्या आधारे आपली कमकुवत बुद्धिमत्ता दाखवून देणे, पूर्ण ऐकून न घेणे, पूर्ण समजून न घेणे, सत्यता पडताळून न पाहणे, सत्यापासून लांब पळणे, ही वैचारिक विकलांग पणाची लक्षण आहेत.
वैचारिक पातळी उंचवण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची गरज नसते तर आवश्यकता असते अंतःकरणापासून परिस्थिती बदलण्याची इच्छाशक्ती असण्याची. विषय सामाजिक असो, कौटुंबिक असो वा वैयक्तिक असो मला काही फरक पडत नाही, माझं काय अडलंय, मला काय घेणं आहे, चालुद्या चाललंय तस, माझं काय जाणार आहे, मला काय फरक पडतोय, मी भला माझं काम भलं, या हिन आणि स्वार्थी विचारांमुळे न समाज पुढे जाईल न कुटुंब न आपण. अश्या मानसिकतेमुळे प्रश्न वाढतच जातील, गुंता होतच राहील, परिस्थिती अजून बिकट होईल, आपल्या हाताबाहेर जाईल आणि एकदिवस असा येईल कि सर्व काही संपलेलं असेल.
आज माझ्या हातात काय आहे, मी स्वतः बदल घडवण्यासाठी काय करूशकतो, माझं योगदान काय असेल यावर जर प्रत्येकाने काम केल तर भविष्यातील हानी टाळता येईल. निरोगी विचारशैली आपल्याला असे विचार करण्याची ताकद देऊ शकते. अनेकजण संकट समयी म्हणतात सकारात्मक विचार करावा, पण फक्त विचार करुन चालत नाही तर सकारात्मक कृती देखील तितकीच महत्वाची असते. नुसत्याच सकारात्मक विचारांनी परिस्थिती आपोआप बदलत नाही तर ती आपल्याला कृती करुन बदलावी लागते. कृती करण्याचं बळ सक्रिय आणि तर्कशुद्ध विचार शैली मधूनच येते.(मोबाईल नंबर -9766863443)