नाशिक,१३ फेब्रुवारी २०२३ – नाशिक महानगरपालिकेने नाशिककरांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या सिटीलिंक बस सेवेस नाशिककरांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व इतर मंडळांच्या शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) ह्या दोन्ही परीक्षा नियोजित आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ह्या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तणावमुक्तरीत्या परीक्षा केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी परीक्षांच्या वेळांत शहरातील सर्वच विद्यालये व महाविद्यालयांसाठी सिटीलिंकच्या विशेष बसफेऱ्या सुरु करण्यात याव्यात अशी मागणी मनविसे तर्फे करण्यात आली आहे .
तसेच अनेक वेळा सिटीलिंकच्या बसफेऱ्या ऐनवेळेस विविध कारणांनी रद्द करण्यात येतात. ऐन परीक्षांच्या वेळेत बसफेऱ्या रद्द केल्यास विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड मनःस्तापास सामोरे जावे लागू शकते. परीक्षाकाळात ऐनवेळेस बसफेऱ्या रद्द न करता बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सिटीलिंकचे मा. मिलिंद बंड जनरल मॅनेजर ऑपरेशन (NMPL), नाशिक यांना देण्यात आले आहे.
यावेळी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमेश भोई, शशिकांत चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल पाटील, मनोज गोवर्धने, शहराध्यक्ष संदेश जगताप, शहर-संघटक ललित वाघ, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, जिल्हा सचिव शुभम थोरात, अक्षय कोंबडे, मेघराज नवले, गणेश शेजुळ, सार्थक देशपांडे, विराज आंबेकर, निखिल गोडसे, शुभम महाले, कृष्णा मुर्तडक, दिपक एलमामे, अक्षय घोलप..आदी महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.