भावार्थ दासबोध – भाग  १७ 

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

संध्या नाही, स्नान नाही, भजन नाही, देवदेवतांची पूजा नाही, मंत्र नाही, जप नाही, ध्यान नाही, मानसपूजा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, नेम नाही, देव नाही, धर्म नाही, अचानक आलेल्या अतिथीला अन्नदान करणे नाही, सद्बुद्धी नाही, गुण नाही, कथा नाही, श्रवण नाही, अध्यात्म निरूपण कधी ऐकले नाही.  चांगल्या लोकांची संगत नाही, शुद्ध चित्तवृत्ती नाही त्यांना मिथ्या अहंकारामुळे कैवल्याचे प्राप्ती नाही !

नीती नाही, न्याय नाही पुण्याचा उपाय नाही. योग्य आचरण करून परमेश्वर प्राप्तीची सोय पाहिली नाही. नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, कला नाही नम्रता नाही, सरस्वतीची कृपा नाही. शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभाशुभ साधनादिक काहीच नाही. स्वच्छता नाही, स्वधर्म नाही,आचार नाही,  विचार नाही त्यांना ना इकडे ना तिकडे, या लोकरीचे सार्थक नाही त्यांना मुक्त क्रिया, कर्म नाही उपासना नाही,

ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट्य नाही त्यांच्याकडे पाहिले तर काहीच नाही!  उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, परमेश्वराची प्रीती नाही!  दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचा संतोष नाही, परोपकाराचे सुख नाही, हरी भक्तीचा लवलेश देखील अंतर्यामी नाही; अशा प्रकारचे जे लोक असतील ते जिवंत असूनही प्रेतासमान आहेत!  त्यांनी पवित्र लोकांमध्ये हे भाषण करू नये. ज्यांच्याकडे पुरेशी पुण्याची सामुग्री असेल त्यांनाच भगवंताची भक्ती घडेल. जे जे जसे करतील तेच त्यांना प्राप्त होईल. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे  भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त.

दशक दुसरे, समास पाचवा रजोगुण निरुपण
मुळातच मानवी देह हा सत्व, रज, तम या तीन गुणांनी बनलेला आहे. त्यामध्ये सत्वगुण उत्तम होय. सत्व गुणामुळे भगवत भक्ती तर रजोगुणामुळे पुनर्जन्म व तमोगुणांमुळे माणसाची अधोगती होते. त्यातही शुद्ध आणि अशुद्ध असा फरक असून अशुद्धता असेल तर ते गुण बाधक ठरतात. शुद्ध आणि अशुद्ध यांची लक्षण आता सावधपणे ऐका. शुद्ध सत्वगुणी म्हणजे परमार्थी तर अशुद्ध म्हणजे संसारिक होय. संसारिक माणसाच्या जीवनात तीनही गुण असतात, त्यातील एक आला की अन्य दोन जातात. रजतम आणि सत्व यामुळेच जीवन चालू असते, आता रजोगुण कसे असतात त्याचे वर्णन करू या. शरीरामध्ये रजोगुण असल्यास वर्तन कसे असते ते चतुर श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे.

माझे घर माझा संसार तिथे देव कुठून आणला? अशा तऱ्हेचा विचार करतो तो रजोगुण. आई वडील आणि बायको मुलं, सून आणि मुलगी यांचीच काळजी वाहतो तो रजोगुण. चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले कपडे घालावे, चांगले दागिने घालावे, दुसऱ्याचे आपल्याला मिळावे अशी मनामध्ये इच्छा धरतो तो रजोगुण. कोणता धर्म, कोणते दान, कोणता जप, कोणते ध्यान, पापपुण्याचा विचार नाही तो रजोगुण. तीर्थ माहिती नाही, व्रत माहिती नाही, अतिथीचे स्वागत माहिती नाही, अनाचारी मन म्हणजे रजोगुण. धनधान्य साठवावे, मन द्रव्यासक्त असते तरी अत्यंत कृपण म्हणजे रजोगुण. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.