कपड्यावरील दरवाढ स्थगितीबद्दल सरकारचे आभार – ललित गांधी
मुंबई – जीएसटी कौन्सिलने कपडे व फूटवेअर वरील पाच टक्केचा जीएसटी एक जानेवारी पासून १२ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयामुळे देशभरातल्या कापड व फुटवेअर व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
३१ डिसेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कपड्यावरील दरवाढ स्थगित ठेवण्याचा निर्णय केल्याबद्दल ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी जीएसटी कौन्सिलला धन्यवाद दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे केंद्रीय अर्थमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासह जीएसटी कौन्सिल च्या देशातील सर्व राज्यांच्या सदस्य अर्थमंत्र्यांना यासंबंधी निवेदन दिले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन ही स्थगिती मिळवून दिल्याबद्दल गांधी यांनी पियुष गोयल यांचे विशेष आभार मानले.
मात्र त्याचबरोबर फुटवेअर वरील दरवाढ १ जानेवारीपासून लागू होणार असल्याने हा निर्णय पूर्णपणे न घेतल्याबद्दल ललित गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ४६ व्या बैठकीमध्ये वस्त्र उद्योगावरील दरवाढ पुढे ढकलली मात्र फुटवेअर च्या दरवाढीबद्दल चर्चाही झाली नाही.वस्त्रोद्योगातील दरवाढीचा प्रस्ताव जीएसटी च्या दर पुनर्रचना समितीकडे अभ्यासासाठी पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या समितीने फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल द्यावयाचा आहे.
जीएसटी कौन्सिलने कपड्यावरील दरवाढ पुढे ढकलली, ही गोष्ट जरी स्वागतार्ह असली तरी ही दरवाढ रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ललित गांधी यांनी वस्त्रोद्योग व फुटवेअर या दोन्ही वरील दरवाढ रद्द करावी अशी आग्रही मागणी केली असून, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या वतीने यासाठी पुन्हा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.