स्विकार आणि होकार

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

साधी चप्पल घेताना आपल्या पायाला बसेल त्या मापाची चप्पल आपण घेतो. जर तशी नाही घेतली तर घट्ट होणारी चप्पल पायाला चावते आणि सैल होणारी चप्पल पायातून निघुन जाते. मात्र मुलांच आयुष्य घडवताना आपण मुलांच्या मापाचे जोडे त्यांना कधीच बनवून देत नाही. त्यांनी कायम आपल्या जोड्यांमध्ये पाय ठेवून चालावं ही आपली अनाठायी अपेक्षा असते आणि म्हणून “आयुष्यभर जोडे खाण्याची वेळ” काही मुलांवर येते.

 

परवा कुठल्याशा कार्यक्रमात एक सुंदर वाक्य होतं. हिरोला कटलेट खातांना सॉस ऑफर केला जातो पण हिरो नम्रपणाने सॉस नाकारतो आणि म्हणतो, “सॉस फासून कटलेटची मूळ चव घालवायची आणि मग तेच कटलेट चवीने खायचं याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा कटलेट आहे तसं स्वीकारून त्याची चव घेण्यात जास्त मजा आहे!” 

 

किती साधं, सोपे वाक्य आहे पण त्यात एक गर्भित अर्थ आहे. समाजात वावरतांना आपण आपल्यासमोर आलेला माणूस आहे तसा स्वीकारला तर खरी मजा आहे. त्या माणसाला आपल्या सोयीने, तडजोड करून किंवा त्याच्यात बदल करून मग स्वीकारला तर काय मजा आहे? बऱ्याचदा आपण फक्त आपल्या सोयीने वागणाऱ्या माणसांशीच जोडले जातो. जी माणसं आपल्या सोयीने वागत नाहीत किंवा आपल्या मनासारखं वागत नाहीत, आपण त्यांच्या वाऱ्यालाही उभं राहत नाही हा अनुभव थोड्याफार फरकाने आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे.

 

आपल्या संपर्कात येणारी माणसंच काय तर आपल्या मुलांनीही आपल्या सोयीने, आपल्या मर्जीने आणि आपल्याला पटेल तसेच वागले पाहिजे अशी नकळत भूमिका आपण कायम घेत असतो. ‘नकळत’ यासाठी म्हणते कि खूप वेळा ‘आपण हे करतो आहे’ हे आपल्याही लक्षात येत नाही. आपल्या मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. 

 

अनेकदा आपल्या मुलांमध्ये इतरांकडे बघून न्यूनगंड निर्माण होत असतात. कुठेतरी ते स्वतःला कमी लेखत असतात तर काही ठिकाणी ही मुलं भावनिक आधार शोधत असतात. अशा वेळेला जर तो आधार आपण त्यांना दिला नाही तर त्यांच्या मनातला न्यूनगंड वाढत जातो आणि त्याचे रूपांतर मानसिक आजारात देखील होऊ शकते.

 

पॉप म्युझिक आयकॉन “पिंक”! तिचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नुकतंच पिंकला मायकल जॅक्सन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार तिने तिची लहान मुलगी विलो हिला समर्पित केला. पिंकने व्यासपीठावरून तिच्या मुलीला उद्देशून एक छोटेखानी भाषणही केलं, ज्या भाषणातून एक चांगला संदेश आपल्यासारख्या पालकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं म्हणून ही गोष्ट या लेखात मांडते आहे. भाषणाची सुरुवातच “माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकत नाही. मी माझ्या कामात व्यग्र असते” अशा वाक्यांनी केल्याने आजच्या अनेक पालकांना पहिल्या वाक्यातच पिंक कनेक्ट झाली होती. यापुढे ती म्हणाली, “मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आवर्जून माझ्या लेकीला शाळेतून घ्यायला आणि सोडायला जाते. त्या प्रवासात विलो मनमोकळं बोलत असते. मी फक्त श्रोता बनून राहते. मध्यंतरी एकदा तिला शाळेत सोडायला जाताना विलो कारच्या खिडकीतून बाहेर बघत होती. जरा शांत शांत होती आणि अचानक ती म्हणाली ‘आई, मी माझ्या ओळखीतली सगळ्यात कुरुप मुलगी आहे’ हे ऐकल्यावर आई म्हणून मला खूप दुःख झालं पण विलो असं का म्हणते आहे हे मला समजून घ्यायचं होतं म्हणून मी फक्त प्रश्नार्थक ‘हं?’  एवढीच प्रतिक्रिया दिली. त्यावर विलो म्हणाली, “अगं, मी लांब केस असलेल्या मुलासारखी दिसते.” 

 

यावर पिंक शांत बसली , काहीच बोलली नाही आणि घरी गेल्यानंतर पिंकने तिच्या मुलीसाठी एक पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं ज्यामध्ये जगभरातील रॉकस्टार आणि कलाकारांची गोष्ट होती. या कलाकारांची प्रत्येक दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणांवरून खिल्ली उडवली जायची. यात मायकल जॅक्सनचाही उल्लेख होता. ‘कोणीतरी मुलगी असून मुलासारखी दिसणं किंवा मुलगा असून मुलीसारखं दिसणं हे मुळातच नैसर्गिक आहे आणि तुमचं दिसणं हे तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व असू शकत नाही’ असं मत त्या पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मांडलेलं होतं.

 

प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर विलोचे डोळे चमकले मग पिंकने विलोला विचारलं, “बाळा, मी कशी दिसते?” 

त्यावर विलो म्हणाली, “तू छान दिसतेस!”

 

त्यावर पिंकने परत विचारलं, “मी छान दिसते, हे तू म्हणतेस पण अनेक लोकांना मी देखील मुलासारखी वाटते कारण माझं शरीर मजबूत आहे. लोकांनी मला मुलगा म्हणू नाही यासाठी मला केस वाढवतांना तू कधी पाहिलं आहेस का? मुद्दाम मी मुलगी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास करतांना तुला कधी मी दिसली आहे का? मी जशी आहे तशीच जे मला स्वीकारतील त्यांनाच खऱ्या पिंकचा आनंद घेता येईल! तसंच बाळा, तू जशी आहेस तसंच तुला सगळ्यांनी स्वीकारावं यासाठी तु धडपड करू नकोस. तुझ्यातले गुण एक दिवस सगळ्यांना जिंकून घेतील पण त्यासाठी तुला, तू निवडलेला मार्ग वैतागून सोडता येणार नाही! आणि एकच सांगते बाळा, माझ्यासाठी तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहेस!”

 

पिंकच हे भाषण आपल्यालाही अंतर्मुख करत. कित्येकदा समाजाच्या भीतीने, नातेवाईकांच्या भीतीने, आपण आपल्याच मुलांना बदलवण्याचा प्रयत्न करतो. ‘अमुक केलं तर आत्या शाबासकी देईल, तमुक केलं तर मामाला आवडेल’ अशी कारण देऊन, मुलांवर आपले निर्णय लादून, आपण आपल्या साच्याप्रमाणे मुलांना घडवायला बघत असतो. एकदा का ते मूल आपल्या साच्यामध्ये उतरलं की आपल्याला जीवन ‘सुफळ संपूर्ण’ वाटायला लागतं पण त्या मुलांच्या आयुष्याचं काय?  साधी चप्पल घेताना आपल्या पायाला बसेल त्या मापाची चप्पल आपण घेतो. जर तशी नाही घेतली तर घट्ट होणारी चप्पल पायाला चावते आणि सैल होणारी चप्पल पायातून निघुन जाते. मात्र मुलांच आयुष्य घडवताना आपण मुलांच्या मापाचे जोडे त्यांना कधीच बनवून देत नाही. त्यांनी कायम आपल्या जोड्यांमध्ये पाय ठेवून चालावं ही आपली अनाठायी अपेक्षा असते आणि म्हणून “आयुष्यभर जोडे खाण्याची वेळ” काही मुलांवर येते.

 

आपलं मूल स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवं.पालकत्व हा एक मजेशीर व्यवसाय आहे. हो बरोबर वाचलंत, व्यवसायंच!  कारण नोकरी काही तासांपुरती मर्यादित असते पण व्यवसाय 24 तास व्यापून टाकतो! तर पालकत्वाच्या या व्यवसायात बऱ्याचदा, बरेच पालक आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असतात, तरीही कायम चिंतेत असतात. सगळं करून कुणी आपल्याला वाईट म्हणेल का?  कुणी आपल्या मुलांच्या वर्तणुकीवरुन आपल्याला नावं ठेवेल का? यासाठी ते मुलांना सतत धाकात ठेवत असतात. अनेक पालक मी किती चांगला आहे हे सिद्ध करण्यासाठी मुलांवर अनावश्यक खर्च करत असतात. अर्थात मुलांवर किती खर्च करायचा हे सांगणारं कुठलंही नियम पुस्तक नसलं तरीही जे खर्च अगदी गरजेचे आहेत तेवढेच करून बाकीचे व्यर्थ खर्च टाळले तर मुलांनाही बचत करण्याचा, काटकसरीचा एक उत्तम संदेश आपण देऊ शकतो.

 

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात आपण मोबाईल दिला आहे. त्याचा अतिरेक आणि त्या अतिरेकाचे परिणाम यावर मी माझ्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ या मागच्या लेखातून प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मुलांना गरजेपुरते गॅझेट देऊन बाकी खर्च काही चांगल्या पुस्तकांवर केलात तर ते पुस्तक तुमच्या मुलाचा चांगला मित्र बनू शकतो हे लक्षात ठेवा. 

 

मानसशास्त्राच्या काही संशोधनांमधून असं दिसून आल आहे की, जी मुलं आजूबाजूच्या जीवनाचं निरीक्षण करतात, ती मुलं अनेक जीवन कौशल्य शिकतात. दुर्दैवाने आजूबाजूच्या जीवनाच निरीक्षण करण्याची संधीच आपल्या मुलांना मिळत नाही. जेव्हा ती संधी देण्यासाठी आपण कार मधून फिरायला निघतो तेव्हा सताड उघड्या खिडकीमधून बाहेरचा निसर्ग बघण्याऐवजी मुलं मोबाईलच्या खिडकीतंच डोकावताना दिसतात. मुलांनी निरीक्षण करावं याची सवय आपण त्यांना लावत नाही आणि वेळ सुद्धा देत नाही. सकाळी उठल्यापासून शाळेची तयारी, शाळेतून घरी आल्यानंतर एखाद्या क्लास वाट बघत असतो, तो क्लास संपवला कि हॉबी क्लासला पळण्याची गडबड सुरू होते आणि घरी आल्यानंतर शाळेचा होमवर्क डोक्यावर तयारच असतो! एवढ्या सगळ्या दिनक्रमात आपल्या मुलांनी मान वर करून जीवनाच निरीक्षण कधी आणि कसं करायचं ?

 

स्टीव जॉब्स आणि केट मिडलटन या दोघांचा उदाहरण देते आहे. हि दोघं कोण आहेत हे तुम्हाला माहिती असेल असे गृहीत धरते आणि नसेल तर ‘गुगल आत्या’ आहेच मदतीला! तर केट मिडलटन आणि स्टीव्ह जॉब्स त्यांच्या मुलांना आयपॅड आणि टॅब्स् यांचा वापर करण्यासाठी मनाई केलेली आहे. यामागे काय कारण असेल? याचा जरा विचार करा. पालक म्हणून तुम्ही पण ग्रेटच आहात. आपण फक्त आत्मचिंतन करतोय तेही आपल्या मुलांच्या जडणीडणीसाठी महत्वाचं आहे म्हणून!

तुम्ही म्हणाल आम्ही मुलांना देशी-विदेशी फिरायला नेतो. महागडे हॉटेल मधून वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो पण यातून फक्त तुमचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो. मुलं यातून काहीही शिकत नसतात. एखाद्या हॉटेलमधल्या मोठ्या फिश टॅंकमधले रंगीबेरंगी मासे मूलाला रमवतील पण तुम्ही जेव्हा एखाद्या गावी नदीवर किंवा तलावावर मुलाला न्याल आणि तिथे होणारी मासेमारी, त्यात येणाऱ्या अडचणी, पकडलेल्या माशांना साठवणे, खारावणे,  बाजारात नेणे हा प्रवास मुलं जेव्हा बघतील तेव्हाच त्यांना जगरहाटी मधल्या काही गोष्टी समजलेल्या असतील.

 

व्हिडिओ गेम खेळताना अवघड लेवल सहज पार करणारी मुलं, लंगडी पळी खेळतांना सात-आठ पावलं लंगडी घालताना दमतात. रिमोटची खेळणी, बॅटरीवर चालणारी कार, बोलणारी बाहुली, बाहुलीचं स्वयंपाकघर असा सगळा जामानिमा नसेल तर या मुलांचा खेळ थांबतो. आजूबाजूला असलेल्या खोक्यातून बाहुलीचे घर उभं राहू शकतं, कागद कापून घराचे पडदे, बाहुलीचे कपडे होऊ शकतात हा विचार करण्याचा दृष्टिकोन आपणच मुलांना द्यायला हवा, खूप खेळणी न देता काही ठराविक खेळण्यांमध्ये परत परत तोच खेळ नवीन पद्धतीने खेळता येईल का? याचा विचार करून खेळणी निवडायला हवी. 

 

आपल्याला येणारे अनुभव हे आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतात. कित्येकदा आपली मनस्थिती चांगली असेल तेव्हा आपल्याला वाईट वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपण सोडून देतो पण जेव्हा आपली मनस्थितीच वाईट असेल तेव्हा एखादी छोटीशी गोष्टसुद्धा आपल्या जिव्हारी लागते. अशा वेळेला आपल्या अनुचित मनस्थितीत आलेला अनुभव मुलांवर लादू नये असं मला वाटतं. त्या प्रसंगा कडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन आपल्या मुलांमध्ये असू शकतो हा विश्वास ठेवा. कधीतरी आपण चुकल्यानंतर मुलांनी ती चूक दाखवली तर मुलांच्या सुज्ञपणाची दखल घ्या. आपली चूक दाखवली म्हणून मुलांना अपमानित करू नका. पालक म्हणून त्यांच्या मतांचाही आदर करा.

आपण, आपलं व्यक्तिमत्व आणि आपली मुलं वेगवेगळ्या आहोत याचं भान पालकांनी ठेवायलाच हवं. मुलाची आत्मप्रतिमा घडवतांना स्वाभिमान आणि गर्व यातली बारीक सीमारेषा ओळखून त्याची ओळख योग्य वेळेत मुलांनाही करून द्यायला हवी. मुल घडवताना रोज एक वेगळा अनुभव येऊ शकतो. त्याला न कंटाळता सामोरं जाऊन, जे आहे ते स्वीकारून, आपल्या मुलाला त्याच्या मापाचे जोडे बनवून द्या तरच त्याच्या पायातले जोडे त्याचं पाऊल सुरक्षितपणे पुढे पडू देतील याचा विचार करा.

 

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

 

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

 

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.