मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचं निधन झालं आहे.ते ५२ वर्षाचे होते . मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयच्या वरिष्ठ डॉक्टरांनी महत्त्वाची आणि मोठी माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावेळी त्याना तपासण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात हा पहाटे साडेपाच वाजता नव्हे तर पाच वाजून पाच मिनिटांनी झाला होता, असंही म्हटलंय. शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसाला गंभीर मार लागला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या पोलिसाच्या डोक्याला, छातीला आणि लिव्हरला अपघातात फटका बसलाय. जखमी पोलिसावर सध्या उपचार सुरु आहेत. तर गाडीचा चालक हा सुखरुप आहे. विनायक मेटे यांच्या डोक्याला मागच्या बाजूस मोठा मार बसला होता. त्याामुळे ब्रेनस्ट्रेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याचीही शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आता पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबात अधिक खुलासा होऊ शकेल, असंही वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटलंय. ते एमजीएम रुग्णालयात उपस्थित असलेल्या पत्रकारांशी विनायक मेटे यांची पाहणी केल्यानंतर बोलत होते.
सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. या बैठकीपुर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावे तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
राज्यपालांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री. मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
सामाजिक प्रश्नांची जपणूक करणारा नेता हरपला !
विनायक मेटे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक : सुधीर मुनगंटीवार
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यू ची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे . सामाजिक प्रश्नांची अत्यंत संवेदनशीलपणे जाण ठेवून , जपणूक करून त्यासाठी लढणारा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे .मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो कि त्यांच्यावर देण्यात आलेली शिवछत्रपती स्मारकाची जबाबदारी, सतत झपाटल्यगत काम करणारा हा नेता कार्यकर्त्यामध्येही जिव्हाळ्याचा माणूस म्हणून लोकप्रिय होता .विधिमंडळात सजग व अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिला.
श्री विनायक मेटे यांचे अपघाती निधन म्हणजे राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे नुकसान तर आहेच पण त्यांचे कुटुंबीय , शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर मोठा आघात आहे . ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना व श्री विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
शिवसंग्रमचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी ऐकून तीव्र दुःख झाले असून विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते.कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले.शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेर पर्यंत संघर्ष केला.एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
