नाशिक – समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेत्री पुजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्तावही मागविण्यात आले होते. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.
यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हेमंत राठी यांना “जीवन गौरव” पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं.क.कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा.विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.
रविवार दि. ०२ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.अशोक खुटाडे व सचिव अॅड.रविंद्रनाना पगार यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सुविचार मंचच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.