मुंबई – प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात मनोरंजनाचा नवा ठेवा घेऊन आली आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह आता दुपारच्या वेळेतही रसिकांना पाहायला मिळणार आहे. ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’. अभिनेत्री सायली देवधर या मालिकेत सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना सायली म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. याआधी स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकी या मालिकेतून मी भेटीला आले होते. त्यामुळे ही मालिका करताना माहेरी आल्याचं फिलिंग आहे. सिंधू ही कोकणात वाढलेली मुलगी आहे. लहानश्या गावात वाढुनही तिची शिकण्याची इच्छा प्रबळ आहे. तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे. डॉक्टर झाल्यानंतरही गावातल्या लोकांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे.
महत्त्वाकांक्षी आणि खंबीर असं हे पात्र आहे. कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभी रहाणारी आणि स्वत:ची मतं मांडणारी अशी ही सिंधू. सिंधूचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. त्यांची ती मनापासून सेवा करते. मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी आहे. वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सिंधूला तिच्या वडिलांना गमवावं लागतं. यामागे नेमकं कोणतं कारण दडलं आहे हे मालिकेतून उलगडेल. त्यासाठी नवी मालिका लग्नाची बेडी ३१ जानेवारीपासून दुपारी १ वाजता स्टार प्रवाहवर.