मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं समजते आहे. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत इथं आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चतुर्वेदी यांच्यासह देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.