मन गुंतवून ठेवणारा ‘असंभव’ -रहस्य, भावना आणि थरार यांचा अनोखा संगम
'असंभव' चित्रपटाच्या टीझरने वाढवली उत्कंठा
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२५ –Asambhav Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि मनोवैज्ञानिक थराराचा नवा अध्याय उलगडण्यास सज्ज झालेला दिग्दर्शक सचित पाटील यांचा आगामी चित्रपट ‘असंभव’ प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची नवी लाट निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टर्सनंतर आता प्रदर्शित झालेल्या थरारक टीझरने या चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
टीझरच्या पहिल्याच फ्रेममध्ये मुक्ता बर्वेची गूढ उपस्थिती प्रेक्षकांना भारावून टाकते. हवेलीतल्या शांततेत दडलेलं रहस्य, अंधारात दिसणारी सावली आणि अचानक घडणाऱ्या घटनांनी मनाचा ठाव घेणारा अनुभव मिळतो. मुक्ता बर्वे दुहेरी भूमिकेत आहे का? की तिच्या आयुष्यात घडतंय काहीतरी अघटित? हा प्रश्न सध्या चाहत्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
प्रिया बापटही या चित्रपटात एका रहस्यमय पात्रात झळकतेय. तिच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी लपवत असल्याची जाणीव देते. दुसरीकडे सचित पाटील स्वतः एका सत्यशोधकाच्या भूमिकेत दिसतो, तर संदीप कुलकर्णीचा या गूढकथेशी नेमका काय संबंध आहे, याविषयी प्रेक्षकांमध्ये अनेक अंदाज सुरू झाले आहेत.
‘असंभव’(Asambha vMarathi Movie) हा फक्त रहस्यपट नाही, तर मानवी मनाच्या गूढ प्रवासाचा चित्रपट आहे. काही सेकंदांच्या टीझरमध्येच भीती, भावना आणि उत्सुकतेचं अनोखं मिश्रण दिसतं. निसर्गरम्य नैनिताल येथे झालेलं चित्रीकरण, अप्रतिम कॅमेरा अँगल्स, आणि प्रकाशयोजनेंचा वापर – सगळंच भुरळ घालणारं आहे.
दिग्दर्शक सचित पाटील म्हणाले, “‘असंभव’ हा फक्त सिनेमा नाही, तर अनुभव आहे. प्रत्येक पात्रात एक गूढ आहे, आणि ते उलगडत जाताना प्रेक्षकांच्या भावना हलवून सोडतील.”
निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनी सांगितलं, “या चित्रपटात पारंपरिक रहस्यपटाची चौकट मोडून काहीतरी नवं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पटकथा इतकी गुंतवून ठेवणारी आहे की शेवटपर्यंत प्रेक्षकांचा श्वास रोखून धरला जाईल.”
निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील आणि नितीन वैद्य यांनी केली असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर तसेच संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.या प्रकल्पाचं सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. संपूर्ण टीमचं म्हणणं आहे की, “‘असंभव’ हा मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा ठरेल.”प्रेक्षकांसाठी ‘असंभव’ हा केवळ रहस्यपट न राहता, मनाला हादरवणारा आणि विचार करायला लावणारा एक अनुभव ठरणार आहे.