मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे:’राज्यावरील संकटे दूर करा,बळीराजाला सुखी करा!’
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा
पंढरपूर, दि. ६ जुलै २०२५ – Ashadhi Ekadashi Pandharpur आषाढी शुद्ध एकादशीच्या पावन दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यावर असलेली संकटे दूर करण्यासाठी, शेतकरी सुखी व समाधानी राहावा यासाठी, तसेच सर्व जनतेला सन्मार्गाची सुबुद्धी मिळावी यासाठी विठ्ठल चरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी साकडे घातले.
या वेळी मानाचे वारकरी श्री कैलास दामू उगले आणि सौ. कल्पना उगले यांच्यासमवेत पूजा करण्यात आली. महापूजनानंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
वारीत विक्रमी सहभाग – तरुण वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय(Ashadhi Ekadashi Pandharpur)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाची वारी विक्रमी ठरली असून, लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने आले. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाने वारकऱ्यांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ‘जर्मन हँगर’ टेंटची व्यवस्था केल्यामुळे वारकऱ्यांसाठी निवारा सुलभ झाला आहे.
निर्मल, हरित वारी – स्वच्छतेचा जागर
यंदाची वारी केवळ धार्मिक नव्हे तर स्वच्छता व पर्यावरण पूरकतेचा संदेश घेऊन आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, निर्मल वारीच्या माध्यमातून कुठेही अस्वच्छता दिसून आली नाही. संतांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश वारकऱ्यांनी व प्रशासनाने प्रत्यक्षात उतरवला. वारीत हरीनामाचा गजर करत भाविकांना नवचैतन्य अनुभवायला मिळाले.
‘वारी’ ही अध्यात्मिक शक्ती – समाजाला दिशा देणारी परंपरा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वारी ही समाजप्रबोधनाची शक्ती आहे. यात प्रत्येक भाविक दुसऱ्या व्यक्तीत विठ्ठल पाहतो. हाच सहिष्णुता आणि भक्तीचा खरा अर्थ आहे. वारीने भागवत धर्माची पताका उंचावली असून, ही परंपरा जगातील इतर कोणत्याही देशात नाही.
व्हीआयपी दर्शन बंद – सर्वसामान्य भाविकांसाठी अधिक वेळ
पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे यावर्षी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना पाच तास अधिक दर्शन वेळ मिळाल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण
पायी वारीत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले:
प्रथम क्रमांक: श्री संत रोहिदास दिंडी क्र. १३ (तुकाराम महाराज पालखी)
द्वितीय क्रमांक: श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्र. १९ (ज्ञानेश्वर महाराज पालखी)
तृतीय क्रमांक: श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्र. २३ (ज्ञानेश्वर महाराज पालखी)
मानाच्या वारकऱ्यांना सन्मान व मोफत एसटी पास
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी कैलास व कल्पना उगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास देण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या शासकीय पूजेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय सावकारे, देवेंद्र कोठे, अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि मंदिर समितीचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.