भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'अक्षरभारती' पुस्तकाचे प्रकाशन आणि चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
मुंबई,दि.२९ जानेवारी २०२५ –अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात.भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र .फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला,पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.
अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या वतीने भारतीय विवीध लिप्यांची माहिती आणि कलात्मक बाजू मांडणारे ‘अक्षरभारती’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जहांगीरच्या कला दालनात संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री अच्युत पालव ह्यांचा सत्कार केला.नवनीत प्रकाशनचे अनिल गाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच मा. राज्यमंत्री आशिष जयस्वाल , जहांगीर आर्ट गॅलरीच्या सेक्रेटरी जी.के.मेनन ह्यांचा सत्कार सौ.श्रध्दा पालव ह्यांनी केला.त्यानंतर पद्मश्री अच्युत पालव ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ह्यानंतर नवनीत प्रकाशनचे अनिल गाला आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सुलेखनकार अच्युत पालव भारतीय लिप्यांच्या संवर्धनासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले तसेच ह्या सर्व भारतीय लिप्यांचा समावेश मुलांच्या अभ्यासक्रमात व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन नक्कीच प्रयत्नशील राहील असे आश्वासन मां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,पद्मश्री श्री.पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते प्रमोद पवार यांनी केले.
यासोबतच काही निवडक चित्रांचं प्रदर्शन जहांगीरच्या कला दालनात आयोजित करण्यात आले असून २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.नेहमी लिहील्या जाणाऱ्या लिप्यांचं सौंदर्य वेगळ्या आणि मोठ्या प्रमाणात कसं दिसतं हे पाहण्यासाठी रसिकांबरोबरच शाळा,कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं असं आवाहन सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं आहे.