सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ! CNG,सोनं-चांदी आणि दूध दरवाढीने नागरिक हैराण
मध्यरात्रीपासून CNG महाग; मुंबईसह राज्यभर नवे दर लागू

मुंबई, दि. १४ मे २०२६ – Fuel Price Hike देशभरात वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडवले असून आता इंधनापासून ते अन्नधान्य आणि मौल्यवान धातूंपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडताना दिसत आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतीय बाजारपेठेवर जाणवत असून, सीएनजी, दूध, सोनं-चांदी यांसारख्या दैनंदिन गरजांच्या वस्तू महागल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात CNG च्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यानंतर मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीचा दर ८२ रुपयांवरून थेट ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांसह लाखो प्रवाशांवर आर्थिक ताण वाढणार आहे.
मुंबईतील लाखो वाहनधारकांवर परिणाम (Fuel Price Hike)
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये सुमारे ४ लाख ७० हजार ऑटोरिक्षा, १ लाख ६० हजारांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी वाहनांचा समावेश आहे. सीएनजी दरवाढीनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणीही पुढे येऊ लागली आहे.वाहतूक तज्ज्ञांच्या मते, इंधन दरवाढीचा परिणाम थेट प्रवास खर्चावर होतो आणि त्यामुळे किरकोळ महागाईही वाढते. दैनंदिन कार्यालयीन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या मासिक बजेटवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
आखाती संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. इराण आणि इतर आखाती देशांमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अस्थिर झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत असल्याने त्याचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर रुपयामध्ये मोठी घसरण झाली असून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९५.७० या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे आयात खर्च वाढत असून महागाईचा दबाव आणखी तीव्र झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना मोठे आवाहन
देशातील वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पेट्रोलियम पदार्थांचा वापर मर्यादित ठेवावा, सोन्याची खरेदी काही काळ टाळावी आणि कंपन्यांनी पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.याशिवाय रासायनिक खतांचा वापर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा सल्ला देण्यात आला असून परदेश पर्यटनाऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचेही त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर देशात संभाव्य आर्थिक मंदी, इंधन टंचाई आणि महागाई वाढीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
सोनं-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळी (Gold Price Today)
केंद्र सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून आला असून एका दिवसात सोन्याच्या किंमतीत तब्बल ९ ते ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा पावणे दोन लाख रुपयांच्या घरात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. चांदीच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही याचा मोठा फटका बसत आहे. लग्नसराईच्या हंगामात या वाढीमुळे ग्राहकांची चिंता आणखी वाढली आहे.
दूध दरवाढीने सर्वसामान्यांवर दुहेरी भार (Milk Price Hike)
महागाईच्या या लाटेत आता दूधही महाग झाले आहे. प्रमुख दुग्ध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. अमूल आणि मदर डेअरीच्या नव्या दरांमुळे घरगुती बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमूलच्या ५०० मिली A2 म्हशीच्या दुधाची किंमत 34 रुपयांवरून 36 रुपये झाली आहे. १ लिटर अमूल गोल्ड दूध आता 72 रुपयांना मिळणार असून यापूर्वी हा दर 68 रुपये होता. अमूल टी स्पेशल दुधाचा दर 63 रुपयांवरून ६६ रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच अमूल ताजा आणि शक्ती दूधाच्या किमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे.दूध उत्पादक संघटनांच्या मते, पशुखाद्य, वाहतूक आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. अमूलनंतर इतर दूध उत्पादक संघांकडूनही लवकरच दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.
किरकोळ महागाई दरात वाढ
१२ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार देशातील किरकोळ महागाई दर (CPI) ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ४.२० टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.अन्नधान्य, भाजीपाला, इंधन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट पूर्णपणे विस्कळीत होत आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही महिन्यांत महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता (Petrol Diesel Price Hike)
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर Sanjay Malhotra यांनीही वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींबाबत चिंता व्यक्त केली आहे. इराणमधील परिस्थिती आणखी गंभीर झाली तर सरकारवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारला इंधनावरील अनुदानाचा वाढता ताण दीर्घकाळ सहन करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तसे झाले तर महागाईचा आणखी मोठा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सामान्य नागरिकांसमोर मोठे आर्थिक आव्हान
सीएनजी, दूध, सोनं-चांदी आणि संभाव्य पेट्रोल-डिझेल दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्ग सर्वाधिक दबावाखाली आला असून खर्च कमी करण्यासाठी अनेक कुटुंबांनी आता बचतीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.


