मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर मी सर्वामध्ये थोर असे म्हणतो तेथे रजोगुण आहे हे ओळखावे. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, माझा ठाव अशी मनात हाव म्हणजे रजोगुण! दुसऱ्याचा सगळं जावं माझं मात्र बर असावं असा विचार करतो तो रजोगुण! कपट आणि मत्सर याबरोबरच तिरस्कार किंवा कामाचा विकार येतो तो रजोगुण. बालकावर माया करतो, प्रीतीने पत्नीची आवड वाटते, सगळ्यांविषयी लोभ वाटतो तो रजोगुण. जिवलगाची चिंता ज्यावेळी मनामध्ये वाटते त्यावेळी लगेच तो रजोगुण असल्याचे जाणावे. संसारात खूप कष्ट आहेत; कसा शेवट होणार? असं म्हणत मनात संकट येते तो रजोगुण. मागे जे जे भोगले ते ते मनामध्ये आठवले त्याचे खूप दुःख वाटले म्हणजे रजोगुण होय.
वैभव पाहून आवड निर्माण झाली, आशा इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही म्हणून नाराज झाला हे देखील रजोगुणाचे लक्षण आहे. जे जे दृष्टीस पडले ते मिळावे असे वाटणे ते न मिळाल्यास दुःख होणे म्हणजे रजोगुण. विनोदांमध्ये मन रमते, शृंगारिक गायन, राग रंग मानपान याचा आनंद वाटतो तो रजोगुण. थट्टा-मस्करी, निंदा करणे, सदैव हास्यविनोद करणे हा रजोगुण. कामाच्या वेळी आळस वाटतो, करमणुकीचे खेळ किंवा उपभोगाच्या गोष्टींमुळे आनंदी होतो तो रजोगुण. बहुरूपी, कलावंत, तमाशा, नाटक, नाना खेळ यात पैसे खर्च करतो तो रजोगुण. भरपूर द्रव्यावर अत्यंत प्रेम, गुंडगिरी विषय आसक्ती आवडते, नीच लोकांची संगत आवडते तो रजोगुण. तस्करविद्या आवडते,
दुसऱ्याचे न्यून बोलण्यास आवडते, नित्यनेम करण्यास मन तयार होत नाही तो रजोगुण. देवाच्या कामात लाज वाटते, पोटासाठी कष्ट करतो, प्रपंचाचा स्नेह वाटतो तो रजोगुण. गोडधोड खाण्यात मजा वाटते, देहाला जपणे, पोषण आनदाने करणे, उपास करणे जमत नाही हा रजोगुण. शृंगारिक गोष्टी आवडतात, भक्ती वैराग्य आवडत नाही, पोवाडे लावण्या आवडतात हा रजोगुण. परमेश्वर न ओळखता इतर गोष्टींवर प्रेम करतो, जबरदस्तीने उपभोग घेतो तो रजोगुण.अशा प्रकारचा सबळ असलेला रजोगुण दारूण दुःख भोगावयास लावतो. त्याच्यामुळे जन्म मरण चक्रात माणूस पडतो. हा रजोगुण सुटत नाही, संसार तुटत नाही, प्रपंचात गुंतलेली वासना कमी होत नाही याला कोणता उपाय आहे?
भगवतभक्ती हाच यावर एकमेव उपाय आहे. विरक्ती आली नाही तरी यथाशक्ति भजन करावे.काया वाचा मने, पाने, पुष्पे, फळे परमेश्वराला अर्पण करून सार्थक करावे. यथाशक्ति दान पुण्य करून अनन्यभावाने सुख दुःखामध्ये देवाचेच चिंतन करावे. आदि-अंती एकच देव आहे. मध्ये माया आलेली आहे म्हणून पूर्ण भाव भगवंताच्या ठायी असावा. अशा तऱ्हेने सवळ अशा रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय? ते ओळखण्यासाठी आपण रजोगुण जाणून घेतला. आता पुढे तमोगुण कसा आहे ते श्रोत्यांनी जाणून घेतला पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे रजोगुण लक्षण नाम पंचम समास समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे