भावार्थ दासबोध – भाग ४२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक तिसरे समास नववा मृत्यूचे निरूपण
संसार म्हणजे मृत्यूबरोबर असलेला स्वार, मरण कधी येणार ते सांगता येत नाही. क्षण क्षणाने शरीर मृत्यूच्या जवळ जात असते. मृत्यु नेहमी आपल्याबरोबरच असतो. तो केव्हा होणार? ते माहिती नसते कर्माप्रमाणे प्राणी देशविदेशात कुठेही मरण पावतात. संचित सरले की क्षणाचाही अवकाश लागत नाही वेळ भरतो, न भरतो तोच जावे लागते. एकदम काळाचे दूत देतात आणि मारत सुटतात आणि मग मृत्यूपंथावर आणून सोडतात.

मृत्यू जवळ येताच कोणीही त्याला परत पाठवू शकत नाही, आज ना उद्या, मागेपुढे केव्हातरी मृत्यूला सामोरे जावे लागतेच. मृत्यू ही अशी काठी आहे की पैलवानाच्या मस्तकावर पडले की बलवान महाराज देखील राहत नाहीत. हा क्रूर आहे असा मृत्यू म्हणत नाही, हा झुंजार आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा समरांगणामध्ये संग्रामशूर आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा रागीट आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा प्रतापवान आहे, असे मृत्यू म्हणत नाही. हा उग्र महादुष्ट आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा बलाढ्य आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा धनाड्य आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा सर्व गुणांनी संपन्न आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा विख्यात आहे असा मृत्यू म्हणत नाही, हा श्रीमंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा अद्भुत पराक्रमी आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा करामती आहे, हा तंत्र-मंत्र करणारा जाणकार आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा घोडेस्वार आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हत्तीवर स्वार झालेला आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा लोकांमध्ये वरिष्ठ आहे, हा राजकारणी आहे, हा मोठे वेतन घेणारा पगारदार आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा देसाई आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा व्यवसायी आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा पुंड राजा आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा राजअधिकारी आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा व्यापारी आहे असं मृत्यू म्हणत नाही, ही परनारी राजकन्या आहे असे मृत्यू म्हणत नाही.

मृत्यूला कार्यकारणभाव नसतो मृत्यूला वर्णभेद नसतो, हा कर्मनिष्ठ ब्राम्हण आहे असे मृत्यू म्हणत नाही. मृत्यू व्युत्पन्न म्हणत नाही, संपन्न म्हणत नाही, मृत्यू लोकांमध्ये मोठा विद्वान आहे असे म्हणत नाही. हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा पंडित आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा पुराणिक आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा वैदिक आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा जोशी किंवा याज्ञिक आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा तंत्र-मंत्र शास्त्र जाणनारा मंत्री यंत्री आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा शास्त्रज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा वेदज्ञ आहे असं मृत्यू म्हणत नाही,

हा सर्वज्ञ आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा ब्रह्म हत्यारा आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा गोहत्यारा आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा स्त्रीया, बालकांची हत्या करणारा हत्यारा आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा रागज्ञानी आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा तालज्ञानी आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा तत्त्वज्ञानी तत्ववेत्ता आहे असं मृत्यू म्हणत नाही. हा योगाभ्यासी आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा सन्यासी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा काळाला फसवू शकेल असं मृत्यू म्हणत नाही. हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य-पंचाक्षरी आहे, असे मृत्यु म्हणत नाही. हा गोसावी आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा तपस्वी आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा मनावर विजय मिळविणारा आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा उदासीन आहे असं असं मृत्यू म्हणत नाही हा ऋषीश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही हा कविश्वर आहे असं मृत्यू म्हणत नाही.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!