भावार्थ दासबोध – भाग ५२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक चौथे, समास सातवा, दास्यभक्ती
मागे आपण सहाव्या भक्तीचे लक्षण पाहिले.आता सावधपणे सातवी भक्ती ऐका. सातवी भक्ती म्हणजे दास्यभक्ती.आपल्याला जितके काम दिले असेल तितके करावे, सदा देवाच्या द्वारी, सदा देवाच्या सहवासात असावे. देवाचे वैभव सांभाळावे.काहीही कमी पडू देऊ नये.देवाची भक्ती वाढवत वाढवत न्यावी. भंगलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेली सरोवरे बांधवी,ओसऱ्या, धर्मशाळा चालवाव्या, नवीन स्थापन कराव्या, जर्जर झालेल्या इमारतींचा जीर्णोद्धार करावा. पडलेले काम तत्परतेने करीत राहावे. हत्ती, रथ, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखांसने, मंचक, विमाने नवीन करावे. मेघडंबरी, छत्र्या, सूर्यपाने, निशाणे नवी करून आदरपूर्वक सांभाळीत जावी. नाना प्रकारची वाहने, बसण्याची उत्तम स्थाने, विविध सुवर्णाची आसने प्रयत्नपूर्वक करीत जावी.

भुवने, कोठड्या, पेट्या, दुधी भोपळा, रांजण, कोहळी, घागरी याच्यामध्ये पूर्ण द्रव्य भरत जावे. प्रयत्नपूर्वक नाना भुयारे, तळघरे, विवरे, नाना स्थळे आणि गुप्त द्वारे, मौल्यवान वस्तूंची भंडारे प्रयत्नपूर्वक करीत जावी. अलंकार, आभूषणे, दिव्य वस्त्रे, नाना मनोहर रत्ने, नाना धातू, सुवर्णपात्रे करीत जावी. पुष्प वाटिकाना पाणी द्यावे आणि वृक्ष जगवावे. नाना पशूंच्या शाळा, नाना पक्षी, चित्र शाळा, नाना वाद्ये, नाट्यशाळा, गुणी गायक यांना आश्रय द्यावा. भोजन शाळा, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी पडशाळा यांना आश्रय द्यावा. नाना सुगंधी द्रव्यांची स्थाने, नाना खाद्य,फळांची स्थळे, नाना वस्तूंची नाना स्थाने निर्माण करीत जावी, भंगली असतील तर नूतन करावी. देवाचे वैभव किती म्हणून सांगायचं? सर्व ठिकाणी आदरपूर्वक दास्यत्व करायचं. आपल्या कामाचा विसर पडू देऊ नये. जयंती, महोत्सव, असंभव वाटणारे वैभव चालवायचं हे पाहून स्वर्गातील देवदेखील आश्चर्यचकित होतील असं वैभव चालवायचे.

प्रसंगी कनिष्ठ सेवादेखील करायची. सर्वकाळ प्रसंगाप्रमाणे सावध राहायचं आणि जे जे पाहिजे ते ते ताबडतोब द्यायचं. अत्यंत आवडीने सर्व सेवा करायची. पाय धुणे, स्नान करणे, आचमन, गंधाक्षता, वसने भूषणे, आसने, पाणी, नाना सुमने, धूप दीप नैवेद्य, शयनासाठी उत्तम स्थळे, थंड पाणी, तांबूल, सुंदर गायन, रागरंग करावे. सुगंधी द्रव्ये, अत्तर, नाना सुगंधी तेले, नाना फळे जवळ ठेवावी. सडासंमार्जन करावे. पाण्याची भांडी भरावीत. उत्तम उत्तम कपडे पाण्याने स्वच्छ धुवावेत. सगळ्यांचा आदर सत्कार करावा. हार्दिक स्वागत करावे, अशी ही सातवी भक्ती आहे. नेहमी प्रेमाने, स्तुती पूर्वक सगळ्यांचे अंतःकरण सुखावेल असे गोड भाव गोड बोलावे. अशी ही सातवी भक्ती यथामती वर्णन केली. यातील काही गोष्टी प्रत्यक्ष घडल्या नाहीत तरी मानसपूजा करावी. अशाप्रकारे सद्गुरूचे दास्य करावे. प्रत्यक्ष सेवा घडली नाही तरी मानसपूजा करीत जावी.
इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास सप्तम समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!