भावार्थ दासबोध -भाग ५९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक पाचवे समास दुसरा गुरु लक्षणे 
जय जय रघुवीर समर्थ 

सद्गुरुची माहिती देताना समर्थ रामदास स्वामी महाराज सांगतात की अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, परमार्थ विवरण निरंतर चालू असते, जिथे सारासार विचार आणि जगाचा उद्धार होत असतो, नवविधा भक्तीच्या जिथे अनेकांना आधार होत असतो,  तिथे साधनाची माहिती सांगितली जाते हे सद्गुरुचे लक्षण ओळखावे. अंतरंगात शुद्ध ब्रह्मज्ञान, आणि बाहेर निष्ठेचे भजन असेल त्या ठिकाणी अनेक भक्तांना विश्रांती मिळते.

उपासनेचा आधार नसलेला परमार्थ निराधार असून कर्म नसेल तर अनाचार होतात आणि भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे ज्ञान वैराग्य आणि भजन कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन निती न्याय मर्यादा सगळे असले तरी यामध्ये सद्गुरू नसेल तर उणेपण असून सद्गुरू असेल तर तेथे सर्व आढळते.  तो अनेकांचे पालन करतो, त्याला अनेकांची चिंता असते, त्याच्याकडे नाना साधने असतात. साधन नसताना परमार्थाला प्रतिष्ठा मिळाली तर नन्तर सर्व  भ्रष्ट होईल असा दूरदृष्टी असलेल्या अनुभविंचा विचार असतो. आचार आणि उपासना सोडतात ते भक्त भ्रष्ट दिसतात त्यांच्या महतीला कोणी विचारत नाही, त्याला आग लागो. कर्म आणि उपासनेचा अभाव असतो तिथे लोक बहकतात आणि हा समुदाय तिरस्कृत होतो आणि प्रापंचिक लोक देखील त्याला हसतात. नीच गुरु देखील अयोग्य आहे ,

ब्रह्मसभेमध्ये चोर लपावा त्याप्रमाणे हा विचार आहे. ब्रह्म सभेला त्याचे तीर्थ घेता येत नाही किंवा त्याचा प्रसाद घेतला तर प्रायश्‍चित्त घ्यावं लागतं. तीर्थप्रसाद सांडला तेथे नीचपणा दिसून येतो त्यामुळे गुरुभक्ती क्षीण होते. अशा गुरूला मान दिला तर ब्राह्मण रागवतात. आणि ब्राह्मणाची मर्जी सांभाळू गेले तर गुरू रागावतो. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी अडचण होते त्यामुळे नीच गुरु करू नये. पण आवडीने जर त्याला गुरू केलं तर आपणही भ्रष्ट व्हावं आणि दुसऱ्याला भ्रष्ट करावं, हे वाईटच! याचा विचार केला तर स्वजातीचा गुरु पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार कमी घडेल. जे जे उत्तम गुण असतात हे सद्गुरु चे लक्षण असतं पण ते कसे ओळखायचे हे सांगतो.

एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरू असे लोकांमध्ये म्हणतात. एक कुळगुरू, एक मानलेला गुरु, एक विद्येचा गुरु, एक कुविद्येचा गुरु, एक असद्गुरु, एक शिक्षा करणारा याती गुरु. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देव गुरु असे अनेक जगद्गुरु आहेत. असे सतरा गुरु आहेत यापेक्षा अजून काही आहे त्यांची माहिती देतो. एक स्वप्नात उपदेश देणारे गुरु, एक दीक्षा देणारे गुरु, एक म्हणतात प्रतिमा गुरु, एक म्हणतात मी स्वतःच गुरु! जितका जाती तितके गुरु. याचा विचार करता असे उदंड गुरु आहेत. नाना मते आहेत. पण जो मोक्ष देणारा सद्गुरु आहे तो वेगळाच आहे. नाना सद्विद्येचे गुण त्यापेक्षा जास्त म्हणजे कृपाळुपणा हे सद्गुरु चे लक्षण आहे हे श्रोत्यांनी जाणावे.
इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरु लक्षण नाम समास द्वितीय समाप्त जय जय रघुवीर समर्थ (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.