डॉ. स्वप्नील तोरणे
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीमध्ये साहित्य संमेलन ही महत्वाची घटना असते. वाचकांचा, रसिकांचा सहभाग यास मोठया प्रमाणावर लाभत आहे. विसाव्या शतकाने सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाच्या अनेक चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन समृध्द झाले आहे. या पैकीच एक म्हणजे साहित्य संमेलन. आज याला आलेले महासंमेलनाचे स्वरुप डोळे दिपवून टाकणारे आहे. सुमारे दीड शतकाची वाटचाल असलेल्या परंपरेचा साहित्यरथ आज ९४ व्या संमेलनाच्या उंबरठयावर आहे. या निमित्ताने डॉ. स्वप्नील तोरणे यांनी घेतलेल्या काही निवडक संमेलनांचा मागोवा…’’
असू देत थंडी..
असू देत पाऊस..
असू देत वादळ वारे…
आम्ही सारे स्वागतासाठी सज्ज आहोत..
मांडव सजलाय..
रांगोळ्या घातल्याय..
अक्षर शिल्पे..
रंगवलेल्या भिंती..
चमचमणारे आकाशदिवे..
द्विशतकाहून अधिक ग्रंथ दालने.. अभिजात मराठीचा साज सजविणारा उपमंडप..
सहस्त्रावधी रसिकांना उबदार वातावरणात साहित्यगंगेच्या पर्वणीचा लाभ देणारा भव्य मंडप…
गेल्या एक वर्षापासून या कार्यासाठी कटीबद्ध असलेले पदाधिकारी..
चाळीसहून अधिक समित्यांचे सहाशेच्यावर सदस्य.. शेकडोंच्या संख्येने सहभागी तत्पर स्वयंसेवक..
आम्ही सर्वजण… स्वागतासाठी सज्ज आहोत..
गेल्या दिवाळीपासून होणारं होणारं म्हणून चर्चेत असेलेल्या संमेलनाची तुतारी फुंकली गेली आहे. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला मुख्य सभामंडपात रंगलेल्या
माझ्या जीवीची आवडी या अप्रतीम कार्यक्रमाने पुढील तीन दिवस रसिकांना मंत्रमुग्ध करणारे रहातील यावर शिक्कामोर्तब झाले.स्वागताध्यक्ष मा. ना. छगन भुजबळ यांनी जबाबदारी स्वीकारल्यावर संमेलनाला मूर्त स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली.
संमेलनाच्या तारखाही ठरल्या मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यावर पाणी फिरले.. त्या नंतर दिवाळीच्या काही दिवस अगोदर आताच्या या तारखा निश्चित करण्यात आल्या.
दिवाळीनंतर अगदीच मोजके दिवस असताना संमेलनाचे स्थळ जागा, गर्दी यांच्या अनुषंगाने एमईटी भुजबळ नॉलेज सिटी येथे स्थलांतरीत झाले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मा. भारतीताई पवार आणि महापौर मा. सतीशनाना कुलकर्णी यांनी भूमिपूजन केले. आणि बघता बघता कुसुमाग्रज नगरी उभी राहिली.
खऱ्या अर्थाने हे आव्हान पेलले ते समिरभाऊ भुजबळ, शेफालीताई भुजबळ,दिलीप खैर, निलेश शाहू यांनी. एमइटीच्या अत्यंत समर्पित अशा शिक्षक आणि कर्मचारी वृंदासह अगदी मोजक्या दिवसांत लक्ष नागरिकांचा सहभाग असणारी संमेलन नगरी आज सज्ज झाली आहे.
प्राचार्य प्रशांत पाटील, हेमंतराव टकले, विलास लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंदराव कुलकर्णी, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे, किरण समेळ, सुनील भुरे,चंद्रकांत दीक्षित, दिलीप साळवेकर यांचा संयोजनात मोठा वाटा आहे.
सूक्ष्म नियोजनाची जबाबदारी होती ती मुख्य समिति समन्वयक विश्र्वास ठाकुर यांच्याकडे. तब्बल चाळीस समित्यांचे गठण करुन त्यांना सातत्याने पाठपुरावा करून कार्यरत ठेवण्याचे अवघड कार्य त्यांनी लीलया पेलले. विश्वास क्लब येथे त्यासाठी खास वॉर रूम तयार करण्यात आली. कविवर्य राजू देसले, अतुल खैरनार, वैष्णवी वझे, मनीषा पगारे, पुनम काशीकर, सुदर्शन हिंगमिरे यांच्यासह अनेक मंडळी रात्रीचा दिवस एक करीत होती आणि आहेत.
संमेलनाच्या कार्यालयात दिलीप साळवेकर सर आणि त्यांच्या समवेत अमोल जोशी असंख्य प्रश्नांना सामोरे जात सातत्याने कार्यरत आहेत.
संमेलनात रसिकांसाठी काय नाही हा प्रश्र्न पडावा.. अनेक नामवंत साहित्यिकांचे विचारधन.. मान्यवरांची उपस्थिती असलेला उद्घाटन आणि समारोप सोहळा.. प्रसिद्ध लेखक, कवींची विविध परिसंवाद, काव्य संमेलन, बाल कुमार साहित्य संमेलन, कवी कट्टा, गझल कट्टा कार्यक्रमात असणारी उपस्थिती.. जोडीला नामवंत कलाकारांचे गीत संगीताचे कार्यक्रम.. यांची रेलचेल या ठिकाणी आहे..
तीन तारखेला सकाळी ग्रंथांना पालखीत सजवून.. मान्यवर लेखकांसमवेत हि ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात असेल. ग्रंथमित्र विनायक रानडे यांच्या कल्पकतेने प्रा. डॉ. संभाजी पाटील आणि त्यांचे समिति सदस्य यासाठी लगबग करीत आहेत.
नाशिकच्या साडे तीनशेपेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग असणारी आनंदयात्रा हा तर या संमेलनाचा उत्साहाचा कळस गाठणारी ठरणार आहे. सचिन शिंदे, विनोद राठोड यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांना कविता,नृत्य, नाटीकेच्या स्वरूपात आगळी वेगळी आदरांजली वाहिली जाणारं आहे.
संमेलनाच्या विवीध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सातत्याने शहराच्या विवीध भागातून बस वाहतुकीची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अजून सरले नसल्यानें शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. अगदी लसीकरणाची देखील सोय संमेलनस्थळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे… ऐनवेळी वैद्यकिय मदतीसाठी निष्णात धन्वंतरी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.. आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. हा सोहळा जगभरात पोहचविण्यासाठी साडे तीनशे पेक्षा अधिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हजर झाले आहेत.
हा सगळा खटाटोप रसिका तुझ्यासाठीच बरका.. भले तू लेखक असो नसो.. भले तू चोखंदळ वाचक असो नसो.. माय मराठीवर असलेले तुझे प्रेम मात्र निःसंशय अस्सल बावनकशी आहे..
म्हणूनच आम्ही समस्त तुझ्या स्वागता साठी सज्ज आहोत.. असंख्य अडचणींना सामोरे जात.. रसिका तुझ्याचसाठी ही कुसुमाग्रज नगरी सजली आहे.. अस्मानीच्या सुलतानी सारखा अवकाळी आलेला वादळ वारा.. थंडी..पाऊस अंगावर झेलत तुझ्या आगमनाची वाट पाहत आहे..
डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
9881734838