‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’ची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणार भुजबळांचा इशारा
धोका कमी पण कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार : पालकमंत्री छगन भुजबळ
टेस्टींगसह लसीकरणाचा वेग वाढवावा
नाशिक – मॉल्स, मोठी व्यापारी संकुले व किरकोळ दुकानदारांनी लसीकरण प्रमाणपत्राची शहाविषयी केल्याशिवाय ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करू नये यांनी जी दुकाने याची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येईल त्यांच्यावर बंद/सील करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
या आस्थापनांवर संबंधित स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने करावी तसेच लग्न समारंभ ही कोरोना वाढीच्या संक्रमणातील मोठी सुपर स्प्रेडर असून एखाद्या दुकानात ग्राहक काम संपले तर लगेच निघून जातो परंतु लग्न समारंभातून तासन् तास लोक विनामास्क वावरताना दिसतात. तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर ५० च्या उपस्थितीने बंधन आल्याने आता लोक वाड्या, वस्त्यांवर खुल्या वातावरणात गर्दी करताना दिसतात. अशा कार्यक्रमांवर वॉच ठेवून दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याच्या सूचना यावेळी पालमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. तसेच उल्लेखनीय काम सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत प्रशासनाकडून होईल तिसऱ्या लाटेत धोका कमी असला तरी तरी परिस्थिती अद्यापही कोरोनाशुन्य झालेली नाही, त्यामुळे लसीकरणासह टेस्टींगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना विषयक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ,नितीन गावंडे, निलेश श्रींगी, भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ.उत्कर्ष दुधेडीया, डॉ. सपना पवार व विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या वंचित नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित करावे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन ४०२ मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
शाळा सुरू होताना खबरदारीची जबाबदारी प्रत्येकाची
शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे, त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु शाळकरी मुले बाधित होणार नाहीत यासासाठीच्या उपाययोजना व खबरदारी ही शासन-प्रशासनाबरोबरच शाळा प्रशासन, पालकांचीही जबाबदारी असून ज्या शाळांमध्ये मुले बाधित होतील तेथे शाळा तात्काळ बंद कराव्यात तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांमध्ये आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. असेही आवाहन या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.
लसीकरण आणि टेस्टींग साठी विशेष मोहीम राबवणार : सूरज मांढरे
जिल्ह्यातील रूग्णसंख्या वाढत असली तरी दररोज रिकव्हर होणाऱ्या रूग्णांची संख्याही मागील दोन लाटांच्या तुलनेत चांगली असून मृत्युदरही कमी आहे. त्यामुळे वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण व टेस्टींगची विशेष मोहीम राबवून दैनंदिन सनियंत्रण त्यांवर संबंधित यंत्रणांमार्फत ठेवले जाईल असे सांगून दोन ते अडीच पटींनी लसीकरण व टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात येणार असल्याचे सांगून बालकांच्या मधील संक्रमणाची आत्तापर्यंतची टक्केवारी ही केवळ १० टक्के एवढीच असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून बालकांच्या आरोग्याशी कुठल्याही शाळा प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तडजोड न करता शाळा सुरू करताना बारकाईने नियंत्रण व निरीक्षणाची आवश्यकता असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ,नितीन गावंडे, निलेश श्रींगी, भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ.उत्कर्ष दुधेडीया, डॉ. सपना ठाकरे यांनी भाग घेतला.